नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग ४२ मधील सेक्टर १६,१७,२२,२३ परिसरातील अंर्तगत भागातही गृहनिर्माण सोसायट्याच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर समाजप्रबोधनात्मक सुभाषिते प्रकाशित करण्याची मागणी समाजसेविका व भाजपच्या कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून नवी मुंबई शहरात सुशोभीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याअंर्तगत भिंतींची, पदपथाच्या खालील सिमेंटच्या ठोकळ्यांची, बाह्य भागातील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी सुरू आहे. त्यावर सुभाषिते तसेच वेगवेगळी चित्रे रंगविली जात आहेत. कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये सेक्टर १६,१७,२२,२३ या परिसराचा समावेश होत आहे. प्रभागातील पडलेले डेब्रिजचे ढिगारे, कचरा हटविण्याबाबत मी यापूर्वीही पालिका प्रशासनाकडे प्रत्यक्ष भेटीगाठीतून व लेखी निवेदनातून पाठपुरावा केला होता. स्वच्छता अभियानामध्ये ते कचऱ्याचे व डेब्रिजचे ढिगारे हटवून प्रभागाचा बकालपणा घालविण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्वप्रथम महापालिका आयुक्त व महापालिका प्रशासनाचे सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच आभार मानले आहेत.
प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२,२३ मध्ये अधिकांश भाग हा सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या, रो-हाऊसेस, श्रमिकांच्या चाळी, माथाडी कामगारांच्या वसाहती यांचा समावेश आहे. हा सर्व श्रमिकांचा व अल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचा असून सर्व करधारक रहीवाशी आहेत. स्वच्छता अभियानातंर्गत महापालिका प्रशासनाने केवळ बाह्य भागात तसेच मुख्य रस्त्यावरील गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून आपले कार्य थांबवू नये. तर प्रभागातील अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायट्याच्या संरक्षक भिंती, सार्वजनिक मैदाने, उद्यानांच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर समाजप्रबोधनात्मक सुभाषिते रंगविण्यात यावीत. रंगरंगोटी, सुभाषिते, रंगविली जाणारी छायाचित्रे याचा दर्जाचा चांगला असावा, सुमार नसावा. अंर्तगत भागातही सुशोभीकरण, रंगरंगोटी व समाजप्रबोधनात्मक सुभाषिते रंगविल्यास खऱ्या अर्थाने प्रभागात स्वच्छता अभियान सार्थकी लागल्याचे स्थानिक रहीवाशांना जवळून पहावयास मिळेल. स्वच्छता अभियान राबविणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना आपण कोपरखैराणे प्रभाग ४२ मधील सेक्टर १६,१७,२२,२३ परिसरातील अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या तसेच सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणाच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर सुभाषिते व चित्रे रंगविण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.