नवी मुंबई : उशिरा का होईना, महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार लवकरच वेतन मिळणार आहे. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत असले तरी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना मात्र सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येत होते. ही तफावत दूर करण्यासाठी इंटकचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी प्रशासनाकडे परिवहनच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता.
महापालिका प्रशासनाने महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी जाणार आहे. पालिका आयुक्तांनी त्यास मंजुरी दिली आहे. परिवहनच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वीही तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या काळात परिवहनच्या रोजदांरीवरील कर्मचाऱ्यांना वेतन वाढही कामगार नेते रवींद्र सावंत यांनी इंटकच्या माध्यमातून पाठपुरावा करताना मिळवून दिली होती. २५० रूपये प्रतिदिन मानधन परिवहनमधील रोजदांरीवरील कर्मचाऱ्यांना मिळत होते. रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे त्यात वाढ होवून आता ६०० रूपये प्रतिदिन मानधन रोजदांरीवरील कर्मचाऱ्यांना मिळत आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग व परिवहनच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग हा दुजाभाव व वेतनातील तफावत दूर करण्यासाठी रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तसेच त्यापूर्वीच्या आयुक्तांकडेही प्रत्यक्ष भेटीगाठीतून, निवेदनातून पाठपुरावा केला. इंटककडून होत असलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने परिवहनच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणेबाबतचा प्रस्ताव लवकरच महापालिका प्रशासन पाठविणार असून आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यास मंजुरी दिली आहे. तशा आशयाचे पत्र ५ जानेवारीला महापालिका प्रशासनाने इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांना दिले आहे.महापालिकेतील सर्वच ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवा करण्याबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारकडे महापालिका प्रशासनाने पाठविले आहेत. या कामगारांच्या कायम सेवेसाठी कामगार नेते रवींद्र सावंत हे कॉंग्रेसचे नाना पटोळे बाळासाहेब थोरात, विजय वड्डेट्टिवार,शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, संजय राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यासंदर्भात परिवहन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची कायम सेवा व्हावी यासाठी मंत्रालयीन पातळीवर महाविकास आघाडीच्या सर्वच मातब्बरांकडे पाठपुरावा करणार व त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.