पुणे न्युज ब्युरो : भाजपने निवडणूकीची रणनीती ठरविताना महाविकास आघाडीच्या तुलनेत तुर्तास आघाडी घेतली आहे. आ. गणेश नाईक, आ. मंदाताई म्हात्रे, संजय उपाध्याय, आ. आशिष शेलार यांची नियुक्ती करताना निवडणूकीची रूपरेषा ठरविण्यास सुरूवातही केली आहे. मात्र निवडणूकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सानपाडा परिसरात एका वेगळ्याच चर्चेने मनोरंजन सुरू झाले आहे. यजमान नवी मुंबईमध्ये सानपाड्यातून भाजपाकडे उमेदवारी मागत असतानाच त्यांच्या घरातील अर्धागिनी गावाला महाविकास आघाडीच्या पॅनलमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवित आहे, याविषयी सोशल मिडियावरून सानपाड्यातील घराघरात हे वृत्त व्हायरल झाले आहे.
सानपाडा पामबीच भागातून एक पुणेरी प्रस्थ शिवसेनेतून भाजपात काही महिन्यापूर्वी आले. सानपाड्यातील एका प्रभागात स्थानिक मतदारयादीत नाव नसतानाही या प्रस्थाने उमेदवारीसाठी हट्ट धरत भाजपामधील एका गटाला आपलेसे करत आपली उमेदवारी फायनल झाले असल्याचे सर्वाना सांगण्यास सुरूवातही केली. काही दिवसापूर्वीच भाजपाच्या एका ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या वॉर्ड अध्यक्षाला गृहनिर्माण सोसायटीच्या वादातून धमकी दिल्याचे प्रकरण सानपाडा पोलिस ठाण्यापर्यत जावून पोहोचल्याची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदेश भाजपाकडूनही घेण्यात आली आहे.
आता यजमान भाजपाकडून उमेदवारीची दावेदारी करत असतानाच यजमानांची पत्नी गावाला महाविकास आघाडीच्या पॅनलमधून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचे सानपाड्यातील काही राजकीय घटकांनी सोशल मिडियावर व्हायरलही केले आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचार पत्रकावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादीचे मातब्बर नेते व राज्य सरकारमधील मंत्री दिलीप वळसेपाटील यांचे फोटो आहे व भाजपकडून निवडणूक लढवू पाहणाऱ्या त्या यजमानांचेही छायाचित्र आहे. विशेष म्हणजे सानपाड्यातील शिवसेनेच्या काही घटकांनी काही दिवसापासून हे निवडणूक प्रचारपत्रक जाणिवपूर्वक सोशल मिडियावर ‘व्हायरल’ करू लागले आहेत. या घटकांने काही महिन्यापूर्वीच शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केल्याचे उत्तर शिवसेनेचे घटक हे निवडणूक प्रचार साहित्य पत्रक व्हायरल करून देवू लागले आहेत. यजमान महापालिका निवडणूकीतून सानपाडामधील एका प्रभागातून भाजपकडून तिकिट मागत असताना त्यांची पत्नी मात्र गावाला ग्रामपंचायत निवडणूक महाविकास आघाडीतून लढवित असल्याची खमंग चर्चा सानपाडा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.