नवी मुंबई : कोपरखैराणे, महापालिका प्रभाग ४२ मधील सेक्टर २२ व २३ परिसरातील महापालिकेच्या उद्यानाला आलेला बकालपणा जाणून घेण्यासाठी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी पाहणी अभियान राबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदनातून निमत्रंण दिले आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबई शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान जोरदारपणे राबविले जात असून इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी, त्यावर चित्रे, सुभाषिते काढण्यात येत आहे. परंतु गृहनिर्माण सोसायट्यांच्या भिंतीची रंगरंगोटी करत असताना महानगरपालिका प्रशासन मात्र आपल्या मालकीच्या उद्यानामधील बकालपणाकडे कानाडोळा करत आहे, ही खरोखरीच शोकांतिका आहे. महापालिका प्रभाग ४२ मधील सेक्टर २२ उद्यान, सेक्टर २३ मधील श्री गुरू तेग बहाद्दूर साहेब उद्यान या दोन उद्यानांना सध्या दुरावस्था प्राप्त झाली आहे. या उद्यानाची सफाई, देखभाल व डागडूजी याकडे महापालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याने या उद्यानाला बकालपणा प्राप्त झाला आहे. महापालिका आयुक्तांनी स्वत: प्रशासनातील कोणालाही कल्पना न देता अचानक भेट दिल्यास तेथील सत्य परिस्थितीचे अवलोकन होईल आणि महापालिका प्रशासन उद्यानांबाबत कितपत गंभीर आहे याचीही माहिती होईल. स्थानिक जनतेमध्ये उद्यानाच्या दुरावस्थेमुळे नाराजी आहे. लवकरात लवकर या दोन्ही उद्यानाची महापालिका आयुक्तांनी स्वत: पाहणी करून स्थानिक जनतेची समस्या घेण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दोन्ही उद्यानातील सध्याच्या परिस्थितीबाबतची छायाचित्रे समाजसेविका सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना सादरही केली आहेत.