नवी मुंबई : नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करण्याची लेखी मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई शहरातील नेरूळ नोडमध्ये सेक्टर २४ परिसरात सिडकोचे आगरी – कोळी भवन आहे. या ठिकाणी नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त असणाऱ्या आगरी-कोळी समाजबांधवांचे विवाह समारंभ सवलतीच्या दरात होत असतात. याशिवाय अन्य धर्मियाचे विवाहदेखील या ठिकाणी होत असतात. सध्या विवाह समारंभाचा काळ सुरू आहे. आगरी-कोळी भवन कोरोनामुळे बंद असल्याने आगरी-कोळी समाजबांधवांना अन्य ठिकाणी महागड्या दरात हॉल घेण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारी ओसरली असून अन्य हॉलमध्ये विवाह उत्साहात पार पाडत असताना सिडको प्रशासनाने आगरी-कोळी सांस्कृतिक भवन अजूनही का बंद ठेवले आहे? स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांना व अन्य धर्मियांना विवाहासाठी ते का खुले केले जात नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. अन्य हॉल विवाहासाठी उपलब्ध होत असताना व त्या ठिकाणी थाटामाटात विवाह पार पडत असताना सिडकोनेही आगरी-कोळी सांस्कृतिक भवन लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. हे भवन लवकर सुरू झाल्यास गोरगरीब आगरी-कोळी समाजबांधवांना आपले विवाह या ठिकाणी सवलतीच्या दरात करणे शक्य होईल व त्यांची होणारी आर्थिक लुटमारही टाळता येईल. त्यामुळे संबधितांना लवकऱात लवकर आगरी-कोळी भवन सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.
या आगरी-कोळी भवनामध्ये १२ कामगार काम करत आहेत. या कामगारांकडून आगरी-कोळी भवनाची देखभाल करण्यात येत आहे. कोरोनामुळे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन बंद झाल्यामुळे या कामगारांना गेल्या काही महिन्यापासून वेतनही मिळालेले नाही. या कामगारांची सध्या उपासमार होत असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. आगरी-कोळी सांस्कृतिक भवन लवकरात लवकर सुरू न झाल्यास या कामगारांचे परिवार देशोधडीला लागण्याची भीती आहे. त्यामुळे आपण संबंधितांना हे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन लवकरात लवकर सुरु करण्याचे व संबंधित कामगारांचे थकीत वेतन लवकर देण्याचे आदेश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.