नवी मुंबई : आगीमुळे घर आणि घरातील सर्व सामान, जीवनावश्यक वस्तू जळालेल्या तुर्भे येथील प्रभाग क्रमांक-७३, इंदिरानगर मध्ये राहणारे वृध्द दांपत्य नामदेव राजाराम जाधव यांना समाजसेवक अंकुश मेढकर यांनी आर्थिक मदत तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मायेचा आधार देण्याचे काम केले.
वृध्द नामदेव जाधव आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी जाधव कामावर गेले असता अचानक त्यांच्या घराला लागली आग. परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी जाधव दांपत्याच्या घरात लागलेली आग विझवली. परंतु, तोपर्यंत जाधव यांच्या घरातील संपूर्ण वस्तूंची जळून राख झाली होती. या आगीमध्ये जाधव यांच्या घरात असलेले कपडे, भांडी तसेच घरामध्ये असलेल्या जीवनावश्यक वस्तूंसह घरातील सर्व सामान जळाले. सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. जाधव यांच्या घरात आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झाले नाही.
या घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अंकुश अमृत मेढकर यांनी माजी नगरसेवक अमित मेढकर यांच्या सोबत घटनास्थळी भेट दिली. आगीमध्ये जाधव यांचे घर आणि घरातील संपूर्ण सामान नष्ट झालेले पाहिल्यावर माजी नगरसेवक अमित मेढकर आणि समाजसेवक अंकुश मेढकर यांनी घरात आग लागलेल्या वृध्द जाधव दांपत्याला घराची दुरुस्ती करण्यासाठी रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली. तसेच स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, चादर आणि जीवनावश्यक सामान देऊन वृध्द जाधव दांपत्याचा संसार पुन्हा सुरळीत सुरु करुन दिला. समाजसेवक अंकुश मेढकर यांनी वृद्ध जाधव दांपत्याला केलेल्या मदतीचे इंदिरानगर परिसरातील सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे.