संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimuabailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या ठोक मानधनावरील कायम सेवेचा प्रश्न नगर विकास खात्याशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत व त्यांच्या समवेत असलेल्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले. मकरसंक्रातीच्या दिनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांना खऱ्या अर्थाने ही गोड भेट दिल्याने आता या प्रश्नाला चालना भेटणार असल्याची प्रतिक्रिया कामगार नेते रवींद्र सावंत यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध खात्यांमध्ये ठोक मानधनावर वर्षानुवर्षे काम करत आहेत. या ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष गेल्या काही वर्षापासून मंत्रालय व महापालिका प्रशासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. अधिवेशनातही आमदारांच्या माध्यमातून कामगार नेते रवींद्र सावंत यांनी कामगारांच्या समस्यांना वाचाही फोडलेली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या दालनातही याप्रकरणी पटोळे यांच्या उपस्थितीत मंत्रालय व महापालिका अधिकाऱ्यांची भेटही रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे संपन्न झालेली आहे.
ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेचा प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविताच पालिका प्रशासनातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील शिक्षकांनी रवींद्र सावंत यांची भेट घेवून कायम सेवेसाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले. कामगार नेते रवींद्र सावंत यांनी या शिक्षकांसाठी पाठपुरावा केल्यामुळे महापालिका प्रशासनाने या शिक्षकांच्या कायम सेवेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यातूनच मकर सक्रांतीच्या दिनी ना. वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीस नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकडे, पालिका शिक्षणाधिकारी योगेश कडुस्कर, शिक्षण मंडळाचे उपसचिव यांच्यासह प्रदेश कॉंग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी, कामगार नेते रवींद्र सावंत, अॅड. सिध्दार्थ चवरे यांच्यासह ठोक मानधनावर काम करणारे शिक्षकही या शिष्टमंडळात सहभागी झाले होते.नगरविकास खात्याशी चर्चा करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.