
नवी मुंबई : महापालिकेच्या नागरी विकास कामांचे उद्घाटन माजी नगरसेवक – नगरसेविकांच्या हस्ते न करता स्थानिक आमदार अथवा महापालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्याची लेखी मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे पाचवे सभागृह मे २०२० मध्ये संपुष्ठात आले आहे. त्यानंतर प्रशासकीय राजवट येवून प्रशासक म्हणून आपण स्वत: नवी मुंबईचा कार्यभार सांभाळत आहात. कोरोना काळामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडलेली आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना ओसल्यावर शहरातील प्रभागाप्रभागामध्ये नागरी कामांच्या उद्घाटनांचे पेव फुटले आहे. परंतु हे उद्घाटन माजी नगरसेवक – माजी नगरसेविका यांच्या हस्ते केले जात असल्याने स्थानिक रहीवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले असून प्रशासकीय कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले असल्याचा संशय मनोज यशवंत मेहेर यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
महापालिका सभागृह बरखास्त झाले असताना प्रशासकीय राजवट कारभार सांभाळत असताना नागरी कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक – नगरसेविकांच्या हस्ते केले जात आहे. हे प्रकार सर्वप्रथम थांबले पाहिजे. सभागृह बरखास्त होताच या लोकप्रतिनिधींच्या नावापुढे माजी हा शब्द लागला असून तेही अन्य सर्वसामान्य नवी मुंबईकरांप्रमाणेच एक आहेत. बेलापुर विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभागात ज्या ज्या विकासकामांचे उद्घाटन यापु्ढे होईल ते उद्घाटन माजी नगरसेवक – नगरसेविका यांच्या हस्ते न करता बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे अथवा महापालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.