संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील डेब्रिजचे व कचऱ्याचे ढिगारे हटविण्याची तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्याची, स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी करण्याची तसेच विभागात पाहणी अभियान राबविण्याची मागणी प्रभाग ९६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी नेरूळ विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकारी यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. प्रभागाला शहरी भागात प्रथम क्रमाकांचा स्वच्छतेचा पुरस्कारही नुकताच मिळालेला आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळणाऱ्या प्रभागात मोकळ्या भुखंडावर डेब्रिजचे व कचऱ्याचे ढिगारे असणे ही बाब महापालिका प्रशासनासाठी व स्थानिक रहीवाशांसाठी भूषणावह नसल्याचे सांगत सौ. रूपाली किस्मत भगत यांनी विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देताना नाराजी व्यक्त केली आहे.
प्रभागात सेक्टर १६ए भुखंड क्रं १२२ शेजारी, सेक्टर १६ ए परिमल गृहनिर्माण सोसायटीसमोरील मोकळ्या भुखंडावर डेब्रिजचे ढिगारे पडलेले आहेत. प्रभागातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे कचऱ्याचे डब्बेही तुटलेले आहेत. त्यामुळे सोसायटी आवारात कचरा संकलन करताना तसेच सोसायटीतून कचरा वाहक गाडीपर्यत कचरा वाहून नेताना कचरा विखुरला जातो. त्यामुळे सोसायटीतील आवार व सोसायटीबाहेरील रस्ता याला बकालपणा येवून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत प्रभागातील उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींना रंगरंगोटी अजून बाकी आहे. ती त्वरीत पूर्ण करण्यात यावी तसेच प्रभागातील समस्यांची पाहणी करण्यासाठी लवकरात लवकर पाहणी अभियान राबवावे, जेणेकरून समस्यांची कल्पना येईल व समस्या निवारणासाठी आम्ही सतत करत असलेल्या पाठपुराव्याचेही गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल, असे यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी सांगितले.