नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए व १८ मधील वीज समस्या एमएसईडीसीने तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी प्रभाग ९६च्या भाजपा माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी कार्यकारी अभियंता, नेरूळ यांना भेटून निवेदनातून केली आहे.
कार्यकारी अभियंत्यांची भेट घेवून माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी १) विद्युत डीपी, विद्युत बॉक्सच्या उघड्यावर रस्ता तसेच पदपथावरील खुल्या केबल्स भूमिगत करणेबाबत, विद्युत उपकेंद्र आवारातील परिसराची सफाई करणेबाबत, ३) तुटलेल्या विद्युत डीपीच्या जागी नवीन डीपी बसविणेबाबत आदी मागण्यात लेखी निवेदनातून करताना विभागात पाहणी अभियान राबविण्याची मागणी केली आहे.
महापालिका प्रभाग क्रं ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ परिसराचा समावेश होत आहे. प्रभाग ९६ ला स्वच्छता अभियानामध्ये महापालिकेचा शहरी भागातील प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळालेला आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत आणि पालिका प्रशासनही सकारात्मक प्रतिसाद देताना सहकार्य करत आहे. आपल्याकडूनही समस्या निवारणात सहकार्य मिळाल्यास प्रभागात खऱ्या अर्थाने कोणत्याही समस्या पहावयास मिळणार नसल्याचे सौ. रूपाली किस्मत भगत यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
परिसरातील विद्युत डीपी अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. तुटलेल्या डीपीमुळे परिसराला बकालपणा आलेला आहे. या डीपीमध्ये लहान मुलांनी हात घातला अथवा त्यांचा संपर्क आल्यास जिवितहानी होण्याची भीती आहे. या तुटलेल्या डीपीच्या जागी नवीन डीपी बसविणे आवश्यक आहे. परिसरातील विद्युत उपकेंद्राच्या आवाराची आपण स्वत: पाहणी केल्यास आवारातील मातीचे ढिगारे, तुटलेले दरवाजे व अन्य समस्या निदर्शनास येईल असे यावेळी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी सांगितले.
विद्युत बॉक्सच्या उघड्यावर रस्ता तसेच पदपथावरील खुल्या केबल्स असल्याने बकालपणा आला आहे. परिसर पालिका स्वच्छतेबाबत आग्रही असताना व प्रयत्न करत असताना आपल्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास परिसरातील सर्वाधिक समस्यांचे निवारण होईल. आपण या केबल्स भूमिगत केल्यास पदपथ व रस्त्यावरील बकालपणा संपुष्ठात येवून रहीवाशांना तसेच वाहनचालकांना त्रास जाणवणार नाही. या ठिकाणी पाहणी अभियान राबविल्यास समस्यांची कल्पना येईल. एमएसईडीसीच्या रहीवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तात्काळ निवारण करावे अशी मागणी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केली आहे.