नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए व १८ मधील वीज विषयक सर्वच समस्यांचे लवकरात लवकर निवारण केले जाईल असे आश्वासन पाहणी अभियानादरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता हेमंत चोरे यांनी जनसेवक गणेश भगत यांना दिले.
महावितरणच्या उदासिनतेमुळे विद्युत डीपी, विद्युत उपकेंद्रआवाराचा बकालपणा, खुल्या केबल्स यासह अन्य समस्या प्रभाग ९६ मध्ये होत्या. या प्रभागाला महापालिका प्रशासनाकडून शहरी भागात स्वच्छतेचा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. तथापि महावितरणच्या समस्यांमुळे प्रभागाला काही ठिकाणी बकालपणा येत असल्याचे माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी पामबीच मार्गावरील एनआरआय येथे असणारे कार्यकारी अभियंत्यांची भेटीदरम्यान सांगितले. या समस्यांचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी प्रभागात पाहणी अभियान राबविण्याची लेखी निवेदनातून सौ. रूपाली किस्मत भगत यांनी मागणी केली होती.
या मागणीनुसार महावितरणचे पामबीच विभागातील महावितरणचे उपअभियंता हेमंत चोरे यांनी प्रभागात पाहणी अभियान राबविले. प्रभागातील डीपीची दुरावस्था, उघड्या वायरी व केबल्स, विद्युत उपकेंद्राला आलेला बकालपणा, विद्युत उपकेंद्र आवारातील समस्या पाहणी अभियानात सहभागी झालेल्या जनसेवक गणेशभगत यांनी चोरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. चोरे यांनी महावितरणच्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन गणेश भगत यांना दिले.