स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपमधील नवी मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी भाजपा सोडून अन्य पक्षात जाण्याची परंपरा २५ जानेवारी रोजीही पहावयास मिळाली. बेलापुर विधानसभा मतदारसंघातील जुईनगर नोडमधील प्रभाग ८३च्या माजी नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी भाजपाचा त्याग करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षसुप्रिमो शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी महापौर जयवंत सुतार यांच्या खास गोटातील मानल्या जाणाऱ्या मढवी परिवाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सुतार यांनाही मढवी परिवाराने जुमानले नसल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात बोलले जात आहे.
ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यावर नगरसेविका तनुजा मढवी यांनीही भाजपात प्रवेश केला होता. नाईक समर्थकांमध्ये माजी नगरसेविका तनुजा मढवी यांचेही नाव घेतले जायचे. तथापि येवू घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीत या प्रभागातून भाजपा तनुजा मढवी यांना डावलून माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांना तिकिट देणार असल्याचे राजकीय क्षेत्रात गेल्या काही महिन्यापासून उघडपणे बोलले जात होते. त्यामुळेच भविष्याची वाटचाल म्हणून माजी नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तनुजा मढवी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महत्वाची भूमिका बजावली असून या प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील पदाधिकारीही उपस्थित होते.
- भाजपचे काय होणार?
महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५२ नगरसेवक निवडून आले होते. नाईकांनी भाजपात प्रवेश केल्यावर अशोक गावडे, सपना गावडे, दारावेतील सुतार परिवार आणि सानपाड्यातील बोऱ्हाडे परिवाराने शरद पवारांच्या नेतृत्वावर निष्ठा दाखवित राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हातात कायम ठेवले. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीत तुर्भे नोडमधील मातब्बर प्रस्थ असलेले सुरेश कुलकर्णी शिवबंधनात बांधले गेले. काही दिवसापूर्वीच दिघ्यातील गवते परिवारही शिवबंधनात अडकला. त्यानंतर वाशीतील गायकवाड परिवारानेही राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाशी नोडमध्ये सुरू केली. घणसोली नोडमधील एका माजी भाजपा नगरसेवकाची आणि नेरूळ नोडमधील तीन माजी भाजपा नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या एका मातब्बर मंत्र्याशी भेटीगाठी अलीकडच्या काळात वाढीस लागल्याने त्यांनीही भाजपाला ‘दे धक्का’ करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे निश्चित मानले जात आहे. ऐरोली नोडमधील भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा तर कोपरखैराणे नोडमधील दोन भाजपा नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेशावर आता राजकारणात पैजा लागल्या असून आचारसंहिता लागल्यावर राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याच्या उपस्थितीत वाशीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये तीन-चार जागांचा वाद वगळता सर्वच जागांवर मनोमिलाफ झाल्याने भाजपच्या सत्तेला ग्रहण लावण्यासाठी मागील काही काळापासून महाविकास आघाडी जोरदार वाटचाल करू लागली आहे. त्यामुळेच नवी मुंबईत तीन आमदार असलेल्या भाजपाला महापालिकेतील सत्ता मिळण्यात कितपत यश मिळेल याबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे.