नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 24 येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन बंद असल्याने आगरी-कोळी समाजाला विवाहासाठी अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक होत आहे. 10 फेब्रुवारीपर्यत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न केल्यास टाळे तोडून आगरी-कोळी समाजाचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करण्याचा इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळेचे ग्रामस्थ मनोज मेहेर यांनी लेखी निवेदनातून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे.
कोरोना पर्व सुरू झाल्यापासून सिडकोने नेरूळ सेक्टर 24 येथील ‘आगरी कोळी सांस्कृतिक भवन’ बंदच ठेवले आहे. सध्या कोरोना आटोक्यात येत असून बाहेरील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. अन्य सर्व सांस्कृतिक भवन, विवाहाचे हॉल, अन्य हॉल, वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह, इतकेच नाही तर महापालिकेचेही हॉल आता रहीवाशांसाठी सुरू झाले आहेत. तथापि सिडकोचे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन आजही बंदच आहे. स्थानिक आगरी-कोळी बांधवांना आता विवाहासाठी अन्यत्र महागड्या दराने हॉल घ्यावे लागत आहे. आगरी-कोळी समाजासाठी बांधलेले भवन बंद असल्याने या समाजाची आर्थिक फरफट होत आहे. खासगी तसेच सरकारी हॉल सुरु असताना सिडकोचे ‘आगरी कोळी सांस्कृतिक भवन’ अजून का बंद आहे. ज्या स्थानिक आगरी कोळी समाजबांधवांच्या नावाने हे भवन बांधण्यात आले आहे, त्या समाजाला आज विवाहासाठी भवन उपलब्ध नसल्याने स्थानिक आगरी-कोळी समाज बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यांना इतरत्र अव्वाच्या सव्वा भाडे देवून विवाहासाठी हॉल कार्यक्रमासाठी घ्यावे लागत आहे. स्थानिकांची विवाहासाठी अन्य हॉलसाठी होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी लवकरात लवकर आगरी-कोळी भवन रहीवाशांसाठी सुरू होणे आवश्यक आहे. 10 फेब्रुवारीपर्यत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न झाल्यास नेरूळमधील स्थानिक आगरी-कोळी ग्रामस्थ या भवनचे टाळे तोडून कार्यक्रम करण्यास सुरूवात करणार आहोत, याची नोंद घ्यावी. हे भवन आपण सुरू न केल्यास आम्हाला आमच्या आगरी-कोळी समाजबांधवांसाठी टाळे तोडून भवन सुरू करावे लागणार आहे व यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रसंग निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी सिडको जबाबदार राहील, असा इशारा मनोज मेहेर यांनी दिला आहे.
याबाबत मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही स्वतंत्रपणे निवेदन सादर केले आहे.