नवी मुंबई : महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक कोरोनामुळे जवळपास वर्षभर लांबणीवर पडली आहे. त्यातच आता महापालिका निवडणूकांचे पडघम वाजू लागल्याने व कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागून निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता राजकारणात वर्तविली जात आहे. सानपाडा नोड हा शिवसेनेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा व त्यापाठोपाठ कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असतानाच यंदाच्या निवडणूकीत प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून सानपाडा नोडमध्ये प्रथमच भाजपाचे कमळ फुलणार असल्याची चर्चा सानपाडा नोडमधील राजकारणात सुरू झाली आहे.
या प्रभाग ७६ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बोऱ्हाडे नगरसेवक असून गेल्या काही वर्षापासून या प्रभागावर बोऱ्हाडे परिवाराचे वर्चस्व राहिलेले आहे. दिलीप बोऱ्हाडे हे सुरूवातीला शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस असा प्रवास करत असले तरी प्रभागातील जनतेने त्यांची पाठराखण केलेली आहे. मागील वर्षभराच्या काळात आपल्या जनकल्याणकारी कामाच्या पाठबळावर भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी जनसामान्यांमध्ये चांगलीच मुसंडी मारलेली आहे. कोरोना काळात प्रभाग ७६ आणि आजूबाजूच्या परिसरात पांडुरंग आमले यांनी केलेले कार्य भाजपासाठी पालिका निवडणूकीत फायदेशीर ठरणार आहे.
कोरोना काळात पांडुरंग आमले यांनी केलेले कार्य, दीड वर्षात सातत्याने राबविलेले उपक्रम, स्थानिक उमेदवार व प्रभागातील मतदारयादीत नाव, शिवाय पांडुरंग आमले यांचे सर्वच कुटूंब भाजपात या सर्व बाबी पांडुरंग आमले यांच्या पथ्यावर पडणार असून बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निकटचे कडवट समर्थक अशी पांडुरंग आमले यांची प्रतिमा आहे. १९९५ पासून झालेल्या पाचही सार्वत्रिक निवडणूकांमध्ये सानपाडा नोडमध्ये भाजपचे कमळ अद्यापि फुलले नसले तरी यंदा मात्र पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून प्रभाग ७६ मध्ये भाजपचे कमळ फुलणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.