हा अर्थसंकल्प ना विकासाचा आहे, ना विश्वासाचा आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला आजचा हा अर्थसंकल्प ना विकासाचा आहे, ना विश्वासाचा आहे. हा अर्थसंकल्प देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना दलवाई पुढे म्हणाले की, गेली जवळपास अडिच महिने शेतकऱ्यांचे आंदोलन चाललेले असताना मानवतेच्या दृष्टीकोणातून त्याकडे न पाहता, पाच वर्षात काय केले जाईल असे निय़ोजन आयोगाच्या पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे. २०२१ मध्ये काय करणार हे न सांगता पाच वर्षात काय करणार अशी लोणकढी थाप असलेला हा अर्थसंकल्प आहे.
गेल्या ९ महिन्यापासून काँग्रेस पक्ष शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करा अशी मागणी करत असताना या सरकारने त्याकडेही दुर्लक्ष करुन दोन शासकीय बँका, सार्वजनिक विमा कंपन्या विकण्याचे वाजत-गाजत धोरण या बजेटच्या अनुषंगाने सांगण्यात आले आहे. मध्यमवर्गींयांना मोदी सरकारवर फार भरवसा होता त्यांच्या हातावरही या अर्थसंकल्पाने तुरी दिल्या आहेत. तर दुसरीकडे मोठ्या खाजगी कंपन्यांना देश विकायचे धोरण या अर्थसंकल्पाने अधिक स्पष्ट केले आहे, असे दलवाई यांनी म्हटले आहे.