नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सी-व्ह्यू नेरूळ उद्यानात तातडीने सफाई करून तेथील कचऱ्याचे ढिगारे हटवावे आणि उद्यानाला आलेला बकालपणा हटविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदनातून केली आहे. निवेदनासोबत महादेव पवार यांनी उद्यानातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे फोटोही सोबत जोडले आहेत.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे सी-व्ह्यू उद्यान आहे. गेली 14-15 वर्षे या उद्यानाला नामफलकच नव्हता. आपणाकडे आम्ही पाठपुरावा केल्यावर या उद्यानाला काही दिवसापूर्वीच नामफलक लागलेला आहे. आपण आमच्या अनेक निवेदनांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे विभागातील अनेक समस्या मार्गी लागल्याने आपले मानावे तितके आभार कमीच असल्याचे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सध्या स्वच्छता अभियान जोरदारपणे राबविले जात आहे. शहरातील अंर्तगत तसेच बाह्य भागातील सार्वजनिक जागा, इमारतींच्या संरक्षक भिंतीची सुभाषिते टाकून रंगरंगोटीही केली जात आहे. परंतु या स्वच्छता अभियानातून पालिका प्रशासनाने सी व्ह्यू उद्यान वगळले आहे काय? आपण स्वत: या ठिकाणी भेट दिल्यास उद्यानातील चित्र पाहून आपणासही तसा संशय निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या उद्यानात सुकलेल्या पानाच्या कचऱ्याचे ढिगारे, झाडाच्या सुकलेल्या फांद्या, बिसलेरीच्या बाटल्या आपणास पहावयास मिळतील. या उद्यानाला आज बकालपणा आला असून लवकरात लवकर या उद्यानातील कचऱ्याचे ढिगारे हटवून त्या ठिकाणी स्वच्छता राबविणे आवश्यक आहे. उद्यानातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसराला बकालपणा येत असून सभोवतालच्या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशी नाराजी व्यक्त करू लागले आहेत. स्थानिक रहीवाशांनी याबाबत आमच्याकडे याबाबत तक्रारी केल्याने आपणास आम्ही हे निवेदन सादर करत आहोत. आपणास या निवेदनासोबत काही फोटो पाठवित आहोत. आपण संबंधितांना तातडीने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.