नवी मुंबई : कायम कामगार व तेच काम करणारे कंत्राटी अथवा ठोक मानधनावरील कामगार यांना ‘समान कामाला, समान वेतन’, तसेच कामगार व अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बढत्या, वर्षानुवर्षे न होणाऱ्या बदल्या, कामगारांच्या पाठपुराव्याला प्रशासनाचा कानाडोळा हे चित्र यापुढे दिसणार नाही, कामगारांच्या समस्या लवकरच मार्गी लावून त्यांना सुविधा देण्याची सकारात्मक भूमिका महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबई इंटक अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली भेटीसाठी आलेल्या कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले.
महापालिका प्रशासनात काम करणारे कायम कामगार व अधिकारी तसेच ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी कामगार आदींच्या प्र्रलंबित समस्यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून आपल्या समस्यांचा पाढा वाचला असता पालिका आयुक्त बांगर यांनी हे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यासमवेत उपाध्यक्ष प्र्रल्हाद गायकवाड, रामभाऊ माने, दिनेश गवळी यांच्यासह शिक्षक, लिपिक, वार्डबॉय, नाशिक पॅटर्ननुसार भरती झालेले स्वच्छता निरीक्षक तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी कामगार प्रश्नांवर आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा करताना महापालिका प्रशासनात समान कामाला अद्यापि समान वेतन दिले जात नाही. केवळ राजकीय घटकांकडून त्याबाबत घोषणाबाजी करून आजवर कामगारांची दिशाभूल करण्यात आली आहे. कामगार व अधिकाऱ्यांच्या बढतीसाठी दर 10,12 व 24 वर्षानी आश्वासित योजनेची अंमलबाजवणी झाली पाहिजे, परंतु प्रशासनाकडून ती न झाल्याने आजवर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अन्यायच झालेला आहे. याबाबत कामगारांनी व अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला तर चालढकल केली जाते. अर्थकारणारूपी सुसंवाद साधला तरच फाईलवर सही होते असा धक्कादायक खुलासावजा आरोप कामगार नेते रवींद्र सावंत यांनी या भेटीदरम्यान केला. अनेक वर्षे एकाच पदावर व एकाच खुर्चीव अनेक जण कार्यरत आहेत, त्यामुळे इतरांवर अन्याय होत असल्याने व संबंधितांची अघोषित मक्तेदारी त्या त्या विभागात निर्माण झाल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले. यासह अन्य समस्यांचाही रवींद्र सावंत यांनी चर्चेदरम्यान उहापोह करताना संबंधितांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
कामगारांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्यावर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे तसेच त्यांच्या मागण्यांना न्याय देण्याचे सकारात्मक आश्वासन शिष्टमंडळाला दिले.