नवी मुंबई : प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांना कचराकुंड्या देण्याची लेखी मागणी भाजपचे स्थानिक भागातील कार्यकर्ते व बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निकटवर्तीय समर्थक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातून केली आहे.
सानपाडा प्रभाग ७६ हा सर्वाधिक सिडको गृहनिर्माण सोसायट्यांचा विभाग असून सेक्टर २,३ आणि ८ या परिसराचा समावेश होत आहे. या प्रभागामध्ये ३८ गृहनिर्माण सोसायट्या आहेत. कचराकुंड्या जुनाट झाल्याने रहीवाशांकडून गेल्या काही दिवसापासून नवीन कचराकुंड्याविषयी मागणी आमच्या कार्यालयात येवून केली जात आहे. कचराकुंड्या तुटल्याने कचरा सोसायटी आवारात तसेच कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनापर्यत घेवून जाताना कचरा सोसायटी आवारात व सोसायटी आवाराबाहेरील रस्त्यावर पडून विखुरला जातो. त्यामुळे परिसराला बकालपणा येत असून स्थानिक रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासनाकडून सुका व ओला कचरा असे वर्गीकरण सोसायटीतील रहीवाशांना बंधनकारक केले असून लहान सोसायट्यांना २ व मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना ४ कचराकुंड्या लवकरात लवकर देणे आवश्यक आहे. स्वच्छता अभियानात सानपाडाही स्वच्छ व सुंदर असावा, सानपाडा नोडमध्ये बकालपणा निदर्शनास येवू नये यासाठी प्रभाग ७६ मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांना कचराकुंड्या देण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.