नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २४ मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू करण्यासाठी सिडकोला आम्ही १० फेब्रुवारीपर्यत अंतिम मुदत दिलेली आहे. सिडकोने यावर काहीही हालचाली न केल्यामुळे आम्ही ११ फेब्रुवारीला नेरूळ नोडमधील ग्रामस्थ आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे तोडून आत प्रवेश करून भवन वापरण्यास सुरूवात करणार आहोत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रकार घडल्यास अथवा ग्रामस्थांचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी सिडकोच जबाबदार राहील, असा इशारा सारसोळे गावचे ग्रामस्थ मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना लेखी निवेदनातून दिला आहे.
नवी मुंबई शहरातील नेरूळ नोडमध्ये सेक्टर २४ परिसरात सिडकोचे आगरी – कोळी भवन आहे. या ठिकाणी नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त असणाऱ्या आगरी-कोळी समाजबांधवांचे विवाह समारंभ सवलतीच्या दरात होत असतात. याशिवाय अन्य धर्मियाचे विवाहदेखील या ठिकाणी होत असतात. सध्या विवाह समारंभाचा काळ सुरू आहे. आगरी-कोळी भवन कोरोनामुळे बंद असल्याने आगरी-कोळी समाजबांधवांना अन्य ठिकाणी महागड्या दरात हॉल घेण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारी ओसरली असून अन्य हॉलमध्ये विवाह उत्साहात पार पाडत असताना सिडको प्रशासनाने आगरी-कोळी सांस्कृतिक भवन अजूनही का बंद ठेवले आहे? स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांना व अन्य धर्मियांना विवाहासाठी ते का खुले केले जात नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. अन्य हॉल विवाहासाठी उपलब्ध होत असताना व त्या ठिकाणी थाटामाटात विवाह पार पडत असताना सिडकोनेही आगरी-कोळी सांस्कृतिक भवन लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. हे भवन लवकर सुरू झाल्यास गोरगरीब आगरी-कोळी समाजबांधवांना आपले विवाह या ठिकाणी सवलतीच्या दरात करणे शक्य होईल व त्यांची होणारी आर्थिक लुटमारही टाळता येईल. त्यामुळे संबधितांना लवकऱात लवकर आगरी-कोळी भवन सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.
या आगरी-कोळी भवनामध्ये १२ कामगार काम करत आहेत. या कामगारांकडून आगरी-कोळी भवनाची देखभाल करण्यात येत आहे. कोरोनामुळे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन बंद झाल्यामुळे या कामगारांना गेल्या काही महिन्यापासून वेतनही मिळालेले नाही. या कामगारांची सध्या उपासमार होत असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. आगरी-कोळी सांस्कृतिक भवन लवकरात लवकर सुरू न झाल्यास या कामगारांचे परिवार देशोधडीला लागण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधितांना हे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन लवकरात लवकर सुरु करण्याचे व संबंधित कामगारांचे थकीत वेतन लवकर देण्याचे आदेश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.
याच विषयावर मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्र्यांना ११ जानेवारी २०२१ रोजी लेखी निवेदन सादर केले होते. त्यांनी ते पत्र तात्काळ किशोरराजे निंबाळकर यांना फॉरवर्डही केले होते. तथापि यावर आजतागायत काहीही कार्यवाही झालेली नाही. सिडकोलाही यापूर्वी लेखी निवेदन दिलेलेअसतानाही सिडकोने याप्रकरणी ग्रामस्थांसमोर कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची विवाहप्रकरणी अन्यत्र हॉलमध्ये होत असलेली आर्थिक लुटमार थांबविण्यासाठी ११ फेब्रुवारी या आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे तोडून तेथे प्रवेश करण्याचा इशारा मनोज यशवंत मेहेर यांनी दिला आहे.