नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराप्रमाणेच पाणी बिलात आकारण्यात आलेल्या व्याज रकमेवर सवलत देवून प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात प्रलंबित मालमत्ता कराची प्रकरणे व त्यावर आकारण्यात आलेल्या व्याजामध्ये सुट देवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम देण्याचे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघाली असून त्यामुळे पालिका प्रशासनाच्या तिजोरीत भर पडली आहे. त्या धर्तीवर महापालिका प्रशासनाने पाणी बिलामध्येही मालमत्ता कराप्रमाणेच धोरण अवलंबिले तर अनेक प्रलंबित प्रकरणे कायमचीच निकालात निघतील. त्यामुळे प्रशासनाच्या तिजोरीतही भर पडेल. याप्रकरणी आपण संबंधितांना निर्देश द्यावेत अथवा शासन मान्यतेची परवानगी आवश्यक असल्यास महाराष्ट्र शासनाकडे हे प्रकरण पाठवून देण्याची मागणी शिवसेनेच्या नामदेव भगत यांनी केली आहे.