नवी मुंबई : : नवी मुंबई शहरातील प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,४,८ परिसरातील रहीवाशांकडून विद्युत देयक वसुली करताना सक्तीची भूमिका न अवलंबिता लवचिक भूमिका घेण्याची मागणी भाजपाचे कार्यकर्ते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना काळ ओसरला असला तरी संपलेला नाही. कोरोनामुळे रहीवाशांचे अर्थकारण उध्दवस्त झाले असून ते आता हळूहळू सावरू लागलेले आहेत. त्यातच राज्य सरकारने कोरोना काळातच रहीवाशांवर वीज दरवाढ लादलेली आहे. असे असूनही मधल्या काळात रहीवाशांना अव्वाच्या सव्वा अवास्तव वीजदेयक पाठविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घडलेले आहे. ते वीज बिलही कमी आजतागायत झालेले नाही. अनेकांचे रोजगार गेलेले असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे. मुलांच्या शाळेची फी ही अनेकांना अजून भरता आलेली नाही. सानपाडा प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३, ७,८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील रहीवाशी मध्य, अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. शाळांचा अभ्यास ऑनलाईन असल्याने व येथील रोजगार गेल्याने अनेक रहीवाशी गावीच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून या परिसरातील वीज मीटर काढून घेण्याचे व वीज प्रवाह खंडीत करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आपण रहीवाशांना वीज भरण्याबाबत मुदत वाढवून द्यावी. आलेले देयक टप्याटप्याने भरण्याची मुभा द्यावी. सध्या अर्थकारण मंदावल्याने, रोजगार गेल्याने सर्वच रहीवाशी जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आपण वीज मीटर काढण्याचे तसेच वीज प्रवाह खंडीत करण्याचे प्रकार करू नये. आधीच वातावरण स्फोटक आहेत. रहीवाशी कमालीच्या तणावाखाली आला दिवस ढकलत आहेत. एमएसईडीसीने कोठेतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणूसकी दाखविणे आवश्यक आहे. वीज मीटर काढण्यास अथवा विद्युत प्रवाह खंडीत करण्यास कोणी आल्यास रहीवाशी व त्यांच्यात हाणामारीची पर्यायाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने टोकाची भूमिका न घेता वीज बील भरण्यासाठी रहीवाशांना मुदत वाढवून द्यावी. रास्त दरात वीज देयक पाठवावे तसेच थकीत बील टप्याटप्याने भरण्याची सवलत द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.