नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठविण्याची मागणी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
स्वच्छता अभियान नवी मुंबई शहरात राबविताना कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना राबविण्यास महापालिका प्रशासनाने सुरूवात केली आहेे. ही खरोखरीच स्तुत्य संकल्पना आहे. तथापि त्या त्या परिसरातील कचराकुंड्याउचलताना त्या परिसरातील रहीवाशांच्या कचरा संकलनाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. नेरूळ सेक्टर २ एलआयजी हा अत्यल्प उत्पन्न गटातील श्रमिकांचा निवासी परिसर म्हणून नेरूळ नोडमध्ये ओळखला जात आहे. येथे चाळवजा सोसायट्या असून येथे एकाच सदनिकेत तळमजला व त्यावरील जागेत अनेक कुटूंब राहत आहेत. परिसराच्या मानाने येथे लोकसंख्या अधिक आहे. पालिका प्रशासनाने या परिसरातील कचराकुंड्या काढल्याने येथे बकालपणाची तसेच स्थानिक रहीवाशांच्या आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. येथील कचराकुंड्या काढल्याने रहीवाशांपुढे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री कचरा घरात ठेवल्यास घरे लहान असल्याने कचऱ्याच्या दुर्गंधीचा सर्वानाच सामना करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीचा घरात कचरा ठेवण्याची येथील लोकांची मानसिकता नाही. त्यामुळे अनेकदा रस्त्यावर तसेच एलआयजीतील सार्वजनिक जागांवर कचऱ्याच्या पिशव्या तसेच कचरा साठू लागला असल्याचे विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
महापालिका प्रशासनाने एलआयजी परिसरासाठी दिवसातून दोन वेळा कचरा संकलनासाठी घंटागाड्या पाठविणे आवश्यक आहे. या घंटागाड्याची वेळेबाबत पालिका प्रशासनाने आम्हाला माहिती दिल्यास आम्ही घराघरात जावून ती माहिती वितरीत करू. यामुळे सकाळ व सांयकाळी घंटागाड्या कचरा संकलनासाठी एलआयजी परिसरात आल्यास एलआयजीतील रहीवाशांना कचरा टाकण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागणार नाही. येथील लोकसंख्या अधिक असल्याने काही ठिकाणी कचराकुंड्या बसविणे आवश्यक आहे. रस्त्यावरही कोणी कचरा टाकणार नाही. परिसरात स्वच्छता राहून परिसराला बकालपणा येणार नाही. आरोग्याचीही समस्या निर्माण होणार नाही. समस्येचे गांभीर्य पाहता नेरूळ सेक्टर २ परिसरातील एलआयजी वसाहतीसाठी महापालिका प्रशासनाने दिवसातून दोन वेळा कचरा संकलनासाठी घंटा गाड्या पाठविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.