नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा पुन्हा होवू लागलेला उद्रेक पाहता नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक चार-सहा महिने पुढे ढकलण्याची लेखी मागणी सारसोळेचे ग्रामस्थ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी लेखी निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक उच्चांक आपल्या महाराष्ट्र राज्यातच झालेला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने केलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत. राज्य सरकारचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी पायाला भिंगरी लावून परिश्रम केले आहेत. कोरोना कमी झाला असे वाटत असतानाच कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याचे राज्यात पहावयास मिळू लागले आहेत. लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी होवू लागल्याने मास्कविना फिरणे, गर्दीत मिसळणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातच महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकारण्यांकडून सार्वजनिक हळदीकुंकू, आरोग्य शिबिरे, अत्यल्प दरात धान्य वाटप यासारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन वाढीस लागले आहे. यातूनही नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढीला लागण्याची भीती आहे. राजकारणापेक्षा, निवडणूकीपेक्षा नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. निवडणूका चार-सहा महिन्यांनी कधीही घेता येतील, परंतु कोरोनाचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या जिवितहानीच्या नुकसानीची आपण भरपाई कोठून करणार? राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार व पुन्हा नव्याने होवू लागलेला उद्रेक पाहता नवी मुंबईच्या हितसाठी महापालिका सार्वत्रिक निवडणूका चार-सहा महिने पुढे ढकलणे आवश्यक आहे. जालन्यात नुकतेच लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे चित्र अन्यत्रही दिसण्याची शक्यता आहे. कोरोना पूर्णपणे संपुष्ठात आल्यावर नवी मुंबईसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.