स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ -९८२००९६५७३
नवी मुंबई : नवी मुंबईतील ग्रामस्थांनाही घरात शौचालय उभारणीसाठी अनुदान मिळण्याची मागणी नवी मुंबई महापालिकेचे माजी ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील झोपडपट्टीधारकांना गेल्या अनेक वर्षापासून घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत म्हणून अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला निवासी पर्याय म्हणून राज्य सरकारने शासकीय गरजेपायी नवी मुंबई शहर विकसित केले आहे. येथील स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांनी तसेच अन्य ग्रामस्थांनी आपल्या भातजमिन तसेच अन्य जागेचा भुसंपादनासाठी सहकार्य करताना सरकारला मदत केली आहे. सुरूवातीला जिल्हा परिषद व आता त्यानंतर महानगरपालिका प्रशासन येवूनही गावागावात विकासाच्या नावाने बोंबाबोंब असल्याने कॉलनी परिसर विकसित होत गेला व गावठाण परिसर प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बकालच राहीला आहे. आजही गावागावातील अनेक ग्रामस्थांच्या घरामध्ये शौचालय नसल्याने त्यांना महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागत आहे. महापालिका प्रशासन घरामध्ये शौचालय उभारणीसाठी झोपडपट्टी परिसर, स्लम एरिया, चाळीतील रहीवाशांना अनुदान देवून आर्थिक मदत करत असते. त्याप्रमाणे महापालिका प्रशासनाने गावागावात घरामध्ये शौचालय नसणाऱ्या ग्रामस्थांना आर्थिक मदत म्हणून अनुदान देवून त्यांना घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील ग्रामस्थांना घरामध्ये शौचालय बनविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत म्हणून अनुदान योजना लवकरात लवकर जाहिर करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.