संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाशिवरात्रीच्या दिनी सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात होणाऱ्या बामणदेवाच्या भंडाऱ्यावरही आता कोरोनाचे सावट उमटू लागले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील देवाच्या यात्रा, जत्रा तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमावर कोरोनाच्या पुनरागमनामुळे बंदी येत असताना नवी मुंबईतील शिवभक्तांसाठी श्रध्देचा व भक्तिभावाचा विषय असलेला बामणदेवाचा भंडाऱ्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पामबीच मार्गावर सारसोळे जेटीकडून वाशीकडे जाताना जेटीहून थोडे पुढे आल्यावर पहिलाच डाव्या दिशेनेला टर्न मारल्यावर आपणास खाडीअंतर्गत भागात असलेल्या बामणदेवाच्या मंदिराकडे जाता येते. खाडीअंर्तगत भागात नवी मुंबई महापालिका प्रशासनाने बांधलेले रस्ते खचलेले असले तरी बामणदेवाच्या दर्शनासाठी घेवून जाणारा हा कच्चा रस्ता आपणास कुठेही खचलेला पहावयास मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून सारसोळेच्या खाडीत सारसोळेच्या ग्रामस्थांकडून महाशिवरात्रीच्या दिनी बामणदेवाच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असते. खाडीत मासेमारी करावयास गेल्यास अनेक संकटापासून बामणदेवच आपले रक्षण करतो अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची भावना आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी होणाऱ्या या भंडाऱ्यासाठी सारसोळेचे ग्रामस्थ महापालिका प्रशासन व वनविभागाच्या माध्यमातून दरवर्षी या रस्त्यावर सफाई अभियान राबवून कच्चा व खाचखळग्याच्या रस्त्याची सफाई करतात. यंदाही मागील महिन्यात बामणदेव भंडाऱ्याच्या पार्श्वभूमीवर २० जानेवारी रोजी सारसोळेच्या ग्रामस्थांनी सफाई अभियान राबविले होते. पंरतु राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात अचानक कोरोनाचा उद्रेक होवू लागल्याने यंदाच्या बामणदेवाच्या भंडाऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. याबाबत सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता, गावातील ग्रामस्थ लवकरच मिटीमग घेवून याबाबतचा निर्णय जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.