संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
स्वयंमन्युजब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई: सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये भाजपाचे कार्यकर्ते व समाजसेवक पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ रोजी महिलांसाठी मोफत संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ ८ मार्चपासून सुरु होईल. हे प्रशिक्षण १५ दिवस दररोज २ तास चालणार आहे. महिलांनी रांगोळीचे प्रशिक्षण घेतल्यास विविध मोठ्या कार्यक्रमात या रांगोळीचा फायदा सर्वाना होईल आणि या माध्यमांतून महिलांना उद्योग करण्याची व स्वबळावर आर्थिक सक्षम होण्याची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती समाजसेवक पांडुरंग आमले यांनी दिली.
या प्रशिक्षणासाठी महिलांनी साईभक्त महिला फांऊडेशनकडे नावनोंदणी करणे आवश्यक असून त्यांनी प्रशिक्षणाला येताना सोबत रांगोळी घेवून येणे आवश्यक असल्याचे फांऊडेशनच्या संयोजिका सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी दिली.
साईभक्त महिला फाऊंडेशन आणि समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून सानपाडा विभागातील कोरोना काळात काम करणाऱ्या महिला परिचारिका, डॉक्टर, पोलीस, शिक्षक, व स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योध्दा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका, महिलांची भाषणे, अभिनय स्पर्धा, सांस्कृतिक खेळ आदी स्पर्धाचे महिलांसाठी आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांसाठी साईभक्त महिला फांऊडेशनने मानाची पैठणीही देण्यात येणार आहे. साईभक्त महिला फाऊंडेशनच्या प्रत्येक सदस्यांना यावेळी भेटवस्तू देण्यात येणार आहे. ८ मार्च रोजी सांयकाळी ४.३० वाजता सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरातील रॉयल हॉटेलच्या बाजूला असलेल्या समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात या स्पर्धा होणार असून प्रभाग ७६ मधील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये तसेच आयोजित स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी केले आहे.