नवी मुंबई : महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५-८६ च्या वतीने प्रभागातील महिलांसाठी आयोजित केलेले मोफत आरोग्य चिकित्सा शिविर उत्साहात पार पडले. या प्रभागातील विधवा महिलांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार आणि नुतन महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरामध्ये महिलांसाठी मधुमेह तपासणी, ईसीजी, थॉयराईड, सीबीसी आदी तपासण्या पीआरएस डायग्नोस्टिकच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी शिबिरात सहभागी महिलांसाठी डॉ. शरयू माने यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबिर महिलांसाठी आयोजित करण्यात आले असले तरी उपचारासाठी आलेल्या पुरूषांचीही आरोग्य तपासणी महादेव पवारांनी मोफत करून दिली.
सांयकाळी प्रभागातील विधवा महिलांचा त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये जावून महादेव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन्मान केला. स्वत:वर पती निधनाचा आकाशाएवढा डोंगर कोसळलेला असतानाही स्वत:च्या दु:खाला आवर घालून या महिला घराच्या उभारणीत व मुलांच्या संसार वाटचालीत खंबीरपणे साथ देत असल्यामुळे या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महादेव पवार यांनी दिली. या उपक्रमाच्या आयोजनात महादेव पवार यांच्यासह नुतन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुषमा महादेव पवार, प्रशांत सोळस्कर, रोहिदास हाडवळे, रवींद्र सुर्वे, प्रमोद शेळके, यशवंत मोहिते, विनी राजाध्यक्ष, संतोष लोढे, रवी पवार, रोहन वाघ, निखिल हांडे, दिपक शिंगाडे आदींनी परिश्रम घेतले.