नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करण्याची मागणी समाजसेवक व भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते पांडुरंग विठ्ठल आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरात पुन्हा एकवार कोरोना महामारी हा साथीचा आजार डोके वर काढू लागला आहे. १६ मार्च २०२१ रोजी महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीत कोरोना रूग्णांचा आकडा २२५ आहे. त्यामुळे कोरोनाचा निर्माण होवू पाहणारा उद्रेक कोठेतरी संपुष्ठात येणे आता आवश्यक आहे. महापालिका प्रभाग ७६ मध्ये सानपाडा या परिसराचा समावेश होत आहे. नागरी आरोग्य केंद्र व माता बाल रूग्णालयात कोरोना चाचणीचा पर्याय उपलब्ध असला तरी प्रभागात तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात पालिका प्रशासनाने लवकरात लवकर अॅंण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करणे आवश्यक आहे. लोकांना सोसायटीच्या आवारातच कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध झाली तर लोक स्वत:हून चाचणी करून घेतील. प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करण्यात यावे, तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातही ही शिबिरे लवकरात लवकर आयोजित करण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केली आहे.