आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश
आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज
पनवेल : महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंगळवारी (दि. १६) शासनाच्या नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी करून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश आले आहे. आकृतिबंध आराखड्या संदर्भात सातत्याने शासनाकडे मागणी व सतत पाठपुरावा करीत विधिमंडळाच्या अधिवेशनातही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार आकृतिबंध आराखडा मंजूर झाला आहे.
आकृतिबंधानुसार विविध विभागांतील ६५० नवीन पदांना मंजुरी मिळाल्याने पनवेल महानगरपालिकेत एकूण १०४२ पदे मंजूर झाली आहेत. २३ ग्रामपंचायतींमधील एकूण २८८ कर्मचार्यांचे विविध पदांवर समावेशन करण्यासाठी विविध पदे निर्मितीस ही मान्यता देण्यात आली आहे.
पनवेल महापालिका ही ‘ड’ वर्ग महापालिका आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १० लाख असून, तरंगती लोकसंख्या १३ लाख आहे. सद्यस्थितीत मालमत्ताधारकांची संख्या ३. ५ लाख आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर यापूर्वी ३३ संवर्गातील ४२ पदांना मंजुरी देण्यात आली होती. आयुक्तांनी प्रमाणित केल्यानुसार आस्थापनेवर ३९३ पदे अस्तित्वात आहेत. पनवेलची वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण शासनाच्या आरोग्याशी निगडीत व विकासाच्या योजनांच्या अनुषंगाने वाढलेले काम विचारात घेऊन विविध संवर्गातील ६५० वाढीव पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी व महसुली उत्पन्न लक्षात घेऊनच ही पदे भरणे अनिवार्य असेल. पनवेल महापालिका अंतर्गत प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, तांत्रिक व लेखा सेवेतील पदांवर बदलीने प्रतिनियुक्ती करता येणार नाही. ज्या सेवा बाह्य स्रोताद्वारे करणे शक्य आहे व अशा आवश्यक सेवा बाह्य स्रोताद्वारे पुरविण्यात याव्यात, जेणेकरून अशा पदांचा वेतन इत्यादीचा खर्च कायमस्वरुपी आर्थिक भार महापालिकेच्या आस्थापना खर्चावर होणार नाही. पनवेल महापालिका स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या तत्कालीन २३ ग्रामपंचायतींतीमधील एकूण २८८ कर्मचार्यांचे विविध पदांवर समावेशन करण्यासाठी विविध पदे निर्मितीस ही मान्यता देण्यात आली आहे.