संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईकरांमध्ये वर्तविण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट महाभयावह राहणार असल्याचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली असल्याची भीती आता नवी मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहता शहर आज कोरोना उद्रेकाच्या उंबरठ्यावर येवून पोहोचले आहे. बुधवारी, दि. २४ मार्च रोजी महापालिका प्रशासनाकडून प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार ५१९ नवी मुंबईकरांना कोरोनाची नव्याने लागण झाली असून ३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर १६० कोरोनाग्रस्त कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
आजच्या ५१९ कोरोनाग्रस्तांमध्ये ऐरोली विभागात सर्वाधिक म्हणजेच तब्बल १२० कोरोनाग्रस्त नव्याने आढळून आले आहेत. बेलापुर विभागात कोरोनाचे ७४ रूग्ण, नेरूळ विभागात कोरोनाचे ९५ रूग्ण, वाशी विभागात कोरोनाचे ५७ रूग्ण, तुर्भे विभागात कोरोनाचे ४२ रूग्ण, कोपरखैराणे विभागात कोरोनाचे ७० रूग्ण, घणसोली विभागात कोरोनाचे ५५ रूग्ण तर दिघा विभागात ६ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.
बुधवारी १५४९ नवी मुंबईकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अॅंण्टीजेन टेस्ट करून घेतली. आजवर ३ लाख २० हजार ७९४ लोकांनी ही टेस्ट करून घेतली आहे तर ६ लाख १४ हजार ४३४ लोकांनी आजवर कोव्हिड १९ चाचणी आजवर करून घेतली आहे. कोरोनाने पाचशेचा आकडा ओलांडताच नवी मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने काळजाचा ठोका चुकला आहे. सार्वजनिक जागी वाढलेली गर्दी, मार्जिनल स्पेस तर सोडा मार्जिनल स्पेससमोरील पदपथावरही दुकानचालकांचे अतिक्रमण, ग्राहकांसह दुकानमालक विना मास्क करत असलेले व्यवहार, पदपथावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या कचराकुंड्यांची दुर्गंधी, स्वच्छतेबाबत आयुक्तांच्या सूचनांना पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीच दाखविलेली केराची टोपली यामुळे कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. आजची आकडेवारी ‘अब की बार पाच सौ पार, कोरोनाच्या उद्रेक पोहोचला आता शहराच्या कानाकोपऱ्यात’ ही भीती आता नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर उघडपणे पहावयास मिळू लागली आहे.
स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळविण्याच्या नादात केवळ भिंती रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्याच्या नादात महापालिका वाढत्या बकालपणाकडे कानाडोळा करू लागली आहे. भिंतीची रंगरंगोटी करताना पदपथावर असलेल्या कचराकुंड्या, यामुळे पदपथाला आलेला बकालपणा, लोकांना चालण्यासाठी करावा लागणारा पदपथाऐवजी रस्त्याचा वापर, शहरात वाढलेली फेरीविक्रेत्यांची संख्या, रस्त्यारस्त्यावर फेरीविक्रेत्यांच्या वाढलेल्या हातगाड्या वाहतुक कोंडीला खतपाणी घालत आहेत. दुकानदारांनी मार्जिनल स्पेस बळकावून त्यापुढील पदपथावरही दुकानाचे सामान ठेवून त्यावर अतिक्रमण केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने यावर कारवाई न करता अतिक्रमण व हातगाड्या व्यावसायिक, मार्जिनल स्पेससमोरील पदपथ बळकावणारे दुकानदार या सर्वाशी ‘अर्थ’युक्त संबंध ठेवल्याने बकालपणाला खतपाणी मिळून रोगराई वाढीला हातभार लावला असल्याचे नवी मुंबईकर उघडपणे बोलू लागले आहेत. भिंतीची रंगरंगोटी करून शहर सुशोभीकरणाचा देखावा न करता नवी मुंबईकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी आतातरी गंभीर व्हा असा टाहो नवी मुंबईकरांकडून फोडला जात आहे. कोरोनाचा आकडा ५००च्या पुढे गेल्याने महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.