नवी मुंबई : २८ मार्चचा रविवार, महाराष्ट्राची झोप उडविणारा रविवार ठरला. आज महाराष्ट्रात कोरोना रूग्णांनी तब्बल ४० हजाराचा आकडा ओंलाडला असून कोरोनाने १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत ७१७ कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आले असून ३ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात कोरोनाची लाट वेगाने पसरू लागली असून महाराष्ट्रीयन जनतेच्या चेहऱ्यावर कोरोनाच्या चिंतेचे सावट स्पष्टपणे दिसू लागले आहे. २८ मार्च रोजी राज्यात ४०४१४ लोकांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून १०८ लोकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईतही कोरोना रूग्णांनी उच्चांक गाठला असून ७१७ लोकांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून ३ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत आज सर्वाधिक कोरोना रूग्ण नेरूळ विभागात म्हणजेच नेरूळमध्ये १५७ नव्याने कोरोना रूग्ण आढळून आले आहे. बेलापुर विभागात ९७ कोरोना रूग्ण, वाशी विभागात १२० कोरोना रूग्ण, तुर्भे विभागात ६८ कोरोना रूग्ण, कोपरखैराणे विभागात ८७ कोरोना रूग्ण, घणसोली विभागात ८० कोरोना रूग्ण, ऐरोली विभागात ९६ कोरोना रूग्ण, दिघा विभागात १२ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर २४७ रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रविवारी डिसचार्ज देण्यात आला आहे. ३३९३ लोकांनी रविवारी रॅपिड अॅटिजेन टेस्ट केल्या आहेत. आजवर नवी मुंबईत ११६७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ७५६ कोरोना रूग्णांवर, तूर्भे सेक्टर २४ मधील राधास्वामी सत्संग कोव्हिड सेंटरमध्ये ३२० कोरोना रूग्णांवर, सानपाडा एमजीएम रूग्णालयात ५६ कोरोना रूग्णांवर, नेरूळच्या डीवायपाटील रूग्णालयातील कोरोना विभागात १४१ कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहे. एकीकडे राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करत महापालिका प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत असताना होळीच्या कार्यक्रमावर कोठेही कोरोनाचे सावट दिसून आले नाही. तोंडावर मास्क न लावता रहीवाशांनी गर्दी केलेली ठिकठिकाणी पहावयास मिळाली. दुकाने व हॉटेल यांना रात्री ८ ची वेळ दिलेली असली तरी अर्धे शटर बंद करून दुकाने व हॉटेलातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच होते. नवी मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी विक्रमी उच्चांक करत असतानाच दुसरीकडे रहीवाशांकडून प्रशासनाला सकारात्मक सहकार्य केले जात नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात लवकरच कडकडीत लॉकडाऊन काही महिन्याकरता जाहीर होण्याची शक्यता सरकारी पातळीवरील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
०००००००००००००००००००० ०००००००००००००००००००
काळजी घ्या अन्यथा विनाश अटळ : रविंद्र सावंत
नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोनाची आकडेवारी वाढू लागली आहे. नवी मुंबईकरांकडून प्रशासनाला सहकार्य न होता प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सुचना पायदळी तुडविल्या जात आहेत. कोरोनाची आकडेवारी नियत्रंणात न आल्यास उपचारासाठी जागा न मिळणे, आयसीयूत जागा नसणे, स्मशानात बाहेरील कोरोना रूग्णांना न घेणे, व्हेन्टिलेंटर नसणे या सर्व समस्या मागच्या प्रमाणे निर्माण होतील. परिस्थिती चिंताजनक आहे. आपल्यासह आपल्या घराची व आपल्या शहराची काळजी घेणे आता आपली जबाबदारी आहे. काळजी घ्या अन्यथा विनाश अटळ असल्याची भीती कॉंग्रेसचे नवी मुंबईतील नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.
००००००००००००००० ००००००००००००००००००००००००००