नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ मधील रहीवाशांना विशेषत: महिला वर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने प्रभाग ९६ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
मोरबेसारखे स्वमालकीचे धरण असताना प्रभागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची नाराजी निवेदनातून सौ. रूपाली किसमत भगत यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे सर्व जण घरात असल्याने पाण्याचीगरज वाढली आहे. त्यात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने महत्वाच्या सणांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी पालिका आयुक्तांनी तात्काळ दखल घेवून संबंधितांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. रूपाली किसमत भगत यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.