संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोनाचे तांडव आजही नवी मुंबई शहरात कायमच आहे. गुरूवार, दि. १ एप्रिल रोजी नवी मुंबईत ९७१ नवे कोरोना रूग्ण आढळून आले असल्याने शहरवासियांवर कोरोनाच्या विळख्याची पकड कायम असल्याचे पुन्हा एकवार पहावयास मिळाले आहे. कोरोनाच्या ४ रूग्णांचा गुरूवारी मृत्यू झाला आहे. नवी मुंबई शहरात आजवर आढळून आलेला हा कोरोनाचा विक्रमी उच्चांक आहे. कोरोनाचा आकडा हजाराच्या जवळपास आल्याने नवी मुंबईकरांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबईत आज सर्वाधिक कोरोना रूग्ण बेलापुर विभागात म्हणजेच बेलापुरमध्ये १५६ नव्याने कोरोना रूग्ण आढळून आले आहे. नेरूळ विभागात १४१ कोरोना रूग्ण, वाशी विभागात १३५ कोरोना रूग्ण, तुर्भे विभागात ११६ कोरोना रूग्ण, कोपरखैराणे विभागात ११८ कोरोना रूग्ण, घणसोली विभागात १२७ कोरोना रूग्ण, ऐरोली विभागात १५० कोरोना रूग्ण, दिघा विभागात २८ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर ४०३ रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे गुरुवारी डिसचार्ज देण्यात आला आहे. २३८४ लोकांनी बुधवारी रॅपिड अॅटिजेन टेस्ट केल्या आहेत. आजवर नवी मुंबईत ११७९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ६०८ कोरोना रूग्णांवर, वाशीतील ईटीसी कोव्हिड सेंटरमध्ये १७५, तुर्भे सेक्टर१९ मधील निर्यातदार भवन कोव्हिड सेंटरमध्ये २१०, तूर्भे सेक्टर २४ मधील राधास्वामी सत्संग कोव्हिड सेंटरमध्ये ३२१ कोरोना रूग्णांवर, सानपाडा एमजीएम रूग्णालयात ६२ कोरोना रूग्णांवर, नेरूळच्या डीवायपाटील रूग्णालयातील कोरोना विभागात १३९ कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहे. एकीकडे राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करत महापालिका प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत असताना होळीच्या कार्यक्रमावर कोठेही कोरोनाचे सावट दिसून आले नाही. तोंडावर मास्क न लावता रहीवाशांनी गर्दी केलेली ठिकठिकाणी पहावयास मिळाली. दुकाने व हॉटेल यांना रात्री ८ ची वेळ दिलेली असली तरी अर्धे शटर बंद करून दुकाने व हॉटेलातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच होते. दुकानेच नाहीतर शहरातील बिअर बारही रात्री सुरूच असल्याने तळीरामांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही. बिअर बारसमोरील भागात अंधार ठेवून बंद असल्याचे भासवून आतमध्ये बिनबोभाटपणे बार सुरु असल्याचे दिसून येत आहे. दुकानासमोर अर्धे शटर बंद करून दुकानातील व्यवहार सुरूच आहेत. नवी मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी विक्रमी उच्चांक करत असतानाच दुसरीकडे रहीवाशांकडून प्रशासनाला सकारात्मक सहकार्य केले जात नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात लवकरच कडकडीत लॉकडाऊन काही महिन्याकरता जाहीर होण्याची शक्यता सरकारी पातळीवरील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.