संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे तांडव आजही नवी मुंबई शहरात कायमच आहे. शुक्रवार, दि. २ एप्रिल रोजी नवी मुंबईत ९७७ नवे कोरोना रूग्ण आढळून आले असल्याने शहरवासियांवर कोरोनाच्या विळख्याची पकड कायम असल्याचे पुन्हा एकवार पहावयास मिळाले आहे. कोरोनाच्या ३ रूग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. नवी मुंबई शहरात आजवर आढळून आलेला हा कोरोनाचा विक्रमी उच्चांक आहे. कोरोनाचा आकडा हजाराच्या जवळपास आल्याने नवी मुंबईकरांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबईत आज सर्वाधिक कोरोना रूग्ण बेलापुर विभागात म्हणजेच बेलापुरमध्ये १९३ नव्याने कोरोना रूग्ण आढळून आले आहे. नेरूळ विभागात १४३ कोरोना रूग्ण, वाशी विभागात १३४ कोरोना रूग्ण, तुर्भे विभागात १२७ कोरोना रूग्ण, कोपरखैराणे विभागात १२० कोरोना रूग्ण, घणसोली विभागात १०४ कोरोना रूग्ण, ऐरोली विभागात १४० कोरोना रूग्ण, दिघा विभागात १६ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर ४७२ रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे गुरुवारी डिसचार्ज देण्यात आला आहे. १५२२ लोकांनी शुक्रवारी रॅपिड अॅटिजेन टेस्ट केल्या आहेत. आजवर नवी मुंबईत ११८२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ५५१ कोरोना रूग्णांवर, वाशीतील ईटीसी कोव्हिड सेंटरमध्ये १६९, तुर्भे सेक्टर१९ मधील निर्यातदार भवन कोव्हिड सेंटरमध्ये २१९, तूर्भे सेक्टर २४ मधील राधास्वामी सत्संग कोव्हिड सेंटरमध्ये ३१४ कोरोना रूग्णांवर, सानपाडा एमजीएम रूग्णालयात ६८ कोरोना रूग्णांवर,कोपरखैराणे सेक्टर ५ मधील बहूउद्देशीय केंद्रातील कोव्हिड सेंटरमध्ये १२ कोरोना रूग्णांवर, नेरूळच्या डीवायपाटील रूग्णालयातील कोरोना विभागात १३७ कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहे.
कोरोना रूग्णांच्या भीतीने एकीकडे नवी मुंबईकरांमध्ये भीतीचा थरकाप उडालेला असताना दुसरीकडे आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेचे धिंडवडेही प्रकाशझोतात येवू लागले आहेत. नागरी आरोग्य केंद्रात कोरोना चाचणीसाठी येणाऱ्या रूग्णांना माहितीबाबत दिली जाणारी व्यवस्थाही संतापाची बाब बनली आहे. नागरी आरोग्य केंद्रात सकाळी कोरोना चाचणीसाठी गेलेल्या रूग्णांना तेथील महिला कर्मचारी तपासणी झाल्यावर काही वेळातच सांगते, तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. तुम्हाला थोड्याच वेळात डॉक्टरांचा फोन येईल, घरी जा असे सांगण्यात येते. डॉक्टरांचा दिवसभरात फोन येत नाही. नागरी आरोग्य केंद्रात हेलपाटे मारल्यावर दिवसभरात तेच उत्तर येते. फोन केल्यावरही समाधानकारक उत्तर येत नाही. कागदोपत्री अहवाल हाती न देताच काही मिनिटात रूग्ण पॉझिटिव्ह सांगितला जातो, दिवसभरात फोनही येत नाही, व्हॉटसअपला मेसेजही येत नाही. दिवसभर रूग्ण, रूग्णाच्या घरातले व शेजारचेही एका अनामिक भीतीखाली दिवस घालवितात. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर पालिका आयुक्त डॉ. अभिजित बांगरांनी तात्काळ लक्ष देवून सुधारणा करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.