संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २ मधील महापालिकेच्या क्रिडांगणावर ओरिएण्टल कॉलेजने सुरू केलेल्या अतिक्रमणाच्याविरोधात महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला असतानाही महापालिका प्रशासनाकडे पाठपुराव्याला केराची टोपली दाखवित अतिक्रमणाकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केला आहे. याविरोधात शुक्रवारी (दि. २ एप्रिल) सानपाड्यातील भाजपाच्या पांडुरंग आमले नामक युवा नेतृत्वाने जनआंदोलन करत प्रशासनदरबारी स्थानिकांचा संताप दाखविण्याचे कार्य केले.
स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये एकीकडे प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळविण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कंबर कसलेली असताना दुसरीकडे सानपाड्यातील सेक्टर २ मधील खेळाच्या मैदानावर सुविधा पुरविण्यास महापालिका प्रशासनाला अजूनही वेळ मिळालेला नाही. या मैदानावर मातब्बर राजकारण्याशी संलग्न असलेल्या ओरिएण्टल कॉलेजने सुरू केलेल्या अतिक्रमणाच्याविरोधात स्थानिक रहीवाशांनी महापालिकेला निवेदने देत हे अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याची सतत मागणी केली आहे. स्थानिकांच्या बाजूने भाजपच्या पांडुरंग आमले यांनीही उडी घेत हे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेचे तुर्भे विभाग कार्यालय ते महापालिका मुख्यालय दरम्यान निवेदन देत चपला झिजविण्यास सुरूवात केली आहे.
२००३ सालापासुन या मैदानावर झोपड्यांनी अतिक्रमण करून बकालपणा आणला असतानाही अतिक्रमणावर कारवाई करण्यास आजवर स्थानिकांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाने कानाडोळा केलेला आहे. या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कामगारांची निवडणूक ओळखपत्रेही तयार झालेली असताना महापालिकेची आजही उदासिनता कायमच आहे.
दोन दिवसापूर्वी रात्री १२ वाजता या क्रिडांगणावर मोठमोठ्या मशिनरी आल्या असून ओरियंटल कॉलेजनी संचार बंदी असतानाही फायलींगचे काम चालूही केले होते. परंतु समाजसेवक पांडुरंग आमले व स्थानिक रहिवाशी यांनी आयुक्त व विभागाधिकारी यांनी पत्रव्यवहार करून हे काम बंद केले आहे. हा भूखंड न्यायप्रविष्ट असताना व यावर ‘स्टे’ असताना बांधकाम करण्याचा घाट घातलाच कसा असा सवाल संतप्तर रहिवाशी करत आहेत. भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी दिनांक १० व १६ मार्च २०२१ ला महापालिका आयुक्त व विभाग अधिकारी यांना निवेदने देत अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आज स्थानिक रहीवाशांसमवेत पांडुरंग आमले यांनी या अतिक्रमणाच्या विरोधात क्रिडांगणावर जनआंदोलन करत पालिका प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी करत या अतिक्रमणावर कारवाई न केल्यास नजीकच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी दिला आहे.