नागरिकांनो सावधान, सहा हजार कोरोना रुग्ण बेपत्ता!
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल: महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय ढिसाळ कारभार सुरू आहे. त्यात ५८३६ कोरोना रुग्णांचा काही पत्ताच प्रशासनाला लागला नसल्याने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिकेच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. या भयानक घटनेमुळे महापालिका क्षेत्रात ते सर्व रुग्ण बिनबोभाटपणे मुशाफिरी करत असावेत. पर्यायी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्याऐवजी वाढत आहे. तसेच त्यांच्याकडूनच अनेक जण बाधित होत असताना आयुक्त चष्मा पुसत बसले आहेत.
पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकरराव देशमुख यांच्या कारकिर्दीत कोरोना रुग्ण आटोक्यात येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. आत्मकेंद्री असलेले देशमुख उपदेशाचे डोस पाजण्यापलीकडे काहीच उपाययोजना करीत नसल्याने कोरोना रुग्णांची महापालिकेला माहितीच उपलब्ध होत नसल्याची भयानक घटना उजेडात आली आहे.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील कोविड माहिती समन्वयक पुरुषोत्तम जैस्वाल यांनी पनवेल महापालिका आयुक्तांकडे ५८३६ कोरोनाबाधित रुग्णांचे पुढे काय झाले असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोरोना रुग्ण पुनर्वसनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नसेल तर आयुक्त आणि त्यांची टीम कोणत्या ‘टार्गेट’साठी नोकरी करत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
जवळपास सहा हजार कोरोना रुग्ण पनवेल महापालिका क्षेत्रातून गायब आहेत. ते कुठे आहेत? कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत की कोणत्या कंपनीत काम करीत आहेत. कुठे फिरत आहेत की पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोनासोबत जगून इतरांना बाधित करीत आहेत याचा महापालिका प्रशासनाला काहीच सुगावा लागला नसल्याने नागरिकांना कोविडबाधित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
शहरात कोविड चाचण्या करणारे केंद्र, खासगी हॉस्पिटल यांच्याशी आयुक्तांची आर्थिक देवाणघेवाण असल्याशिवाय त्यांच्यावर आयुक्तांचा अंकुश नाही असे बोलले जाते. कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला देण्यात येते. त्यांच्याकडून महापालिकेला माहिती प्राप्त होते. त्यातून ही गडबड उघडकीस आली आहे.
महापालिका प्रशासन अतिशय ढिम्म असल्याने त्यांना आतापर्यंत जवळपास सहा हजार कोरोना रुग्ण शोधून काढणे, त्यांचा पत्ता हुडकण्यात अपयश आल्याने सगळीकडे कोरोनाचे विषाणू फैलावण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ‘आंधळी कोशिंबीर’चा खेळ खेळण्यात मग्न राहू द्या. आता सरकारच्या ‘मी जबाबदार’ संकेतानुसार आपली काळजी आपणच घ्यावी लागणार आहे. कारण सुधाकरराव देशमुख करतात काय? तर खाली डोकं वर पाय!