सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ –Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहरामध्ये कोरोना मृतांवरील अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तातडीने बनविण्याची मागणी नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कोरोनाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे. शनिवार, दि. ३ एप्रिल रोजी कोरोना रूग्णांचा आकडा १२००हून अधिक आहे. ११८६ लोकांचा कोरोनाने आजवर नवी मुंबईत मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईतील अधिकाधिक स्मशानभूमी या नागरी वसाहतीत आहेत. स्मशानभूमीलाच लागून गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या पहावयास मिळतील. कोरोना रूग्णांवर अंत्यविधी झाल्यावर तात्काळ संपूर्ण स्मशानभूमी व बाहेरील परिसर सॅनिटाईज होणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णांसोबत येणारे नातेवाईक हे एकप्रकारे कोरोना महामारी वाहकाचीच भूमिका नकळत बजावत असतात. नवी मुंबईतील एमआयडीसी भागात अथवा र्निमनुष्य, वर्दळ नसलेल्या ठिकाणी कोरोना मृतावर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी होणे आवश्यक आहे. या स्मशानभूमीत किमान दोन ते तीन मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यविधी होतील अशी तरतूद करावी. कोरोना कालावधीपुरता या स्मशानभूमीसाठी वेगळा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा. ही स्वतंत्र स्मशानभूमी दिवसातून दोन ते तीन वेळा सॅनिटाईज करण्यात यावी. नवी मुंबई शहरात कोरोनाचे वाढते रूग्ण व मृतांचा हजाराहून अधिक आकडा तसेच नागरी वस्तीमधील स्मशानभूमी असल्याने रहीवाशांच्या मनामध्ये वाढत चाललेले समज-गैरसमज पाहता आपण कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी तातडीने बनविण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आदेश द्यावेत अथवा राज्य सरकारने स्वत: पुढाकार घेवून अशी स्मशानभूमी बनवावी अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.