नवी मुंबई : सानपाडावासियांच्या कोरोना चाचणीकरीता महापालिका शाळा अथवा खासगी शाळेतील जागा उपलब्ध करून लवकरात लवकर कोरोना चाचण्या सुरू करण्याची लेखी मागणी भाजपाचे पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढीस लागला असून सध्या दैनंदिन आकडा आता पंधराशेच्या घरात येवू लागला आहे, ही खरोखरीच चिंताजनक बाब आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन करत असलेले प्रयत्न खरोखरीच प्रशंसनीय आहे. सानपाडा नागरी आरोग्य केंद्र जागेने लहान असल्याने त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी केल्या जात नाहीत. त्यामुळे सानपाडावासियांना सानपाडा रेल्वे स्टेशन, तूर्भे अथवा नेरूळच्या माताबाल रूग्णालयात जावून कोरोना चाचणी करून घ्यावी लागत आहे. सानपाडामध्ये महापालिका शाळा तसेच खासगी शाळा आहेत. या शाळांमधील काही जागा महापालिका प्रशासनाने ताब्यात घेवून त्या ठिकाणी लवकरात लवकर कोरोना चाचण्या सुरू करून सानपाडावासियांना दिलासा देणे आवश्यक आहे. सानपाडा नागरी आरोग्य केंद्राची जागा लहान असल्याने महापालिका प्रशासनाने महापालिका शाळा अथवा खासगी शाळेतील जागेच्या पर्यायाचा विचार करून सानपाडावासियांच्या कोरोना चाचण्यांबाबत गंभीरपणे कृती करणे आवश्यक आहे. सानपाडावासियांना कोरोना चाचण्यांसाठी सानपाडा रेल्वे स्टेशन, तुर्भे, नेरूळचे माताबाल रूग्णालय या ठिकाणी जाण्याकरिता वेळेचा व पैशाचा चुराडा करावा लागत आहे. कोरोना चाचण्यांसाठी सानपाडावासियांची कोठेतरी होत असलेली ससेहोलपट थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सानपाडा येथील महापालिका शाळा अथवा खासगी शाळेचा काही भाग ताब्यात घेवून लवकरात लवकर सानपाडावासियांसाठी तेथे कोरोना चाचण्या सुरू करून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.