कामगार नेते रवींद्र सावंत यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना काळात सेवेचे कर्तव्य बजावताना कोरोना मृत पावलेल्या वित्त व लेखा विभागातील वाहन चालकाला आर्थिक नुकसान भरपाई प्रशासनाकडून तातडीने मिळण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या पर्वात कोरोनाने नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात प्रचंड थैमान घातले आहे. दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून ती आता पंधराशेच्या घरात जावून पोहोचली आहे. कोरोना काळातही स्वत:च्या व स्वत:च्या परिवाराचा जीव धोक्यात घालून नवी मुंबईकरांची सेवा करणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कंत्राटी, ठोक मानधनावरील तसेच कायम संवर्गातील कर्मचारी आणि अधिकारी यांची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. त्यांचे योगदान नवी मुंबईकर कधीही विसरणार नाही नसल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेच्या वित्त व लेखा विभागात कंत्राटी पध्दतीने चालणाऱ्या वाहनावरील चालक सुनील नामदेव वाघमारे यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. कोरोना काळ असतानाही वाघमारे प्रशासनात आपली सेवा बजावत होते. सेवा देत असतानाच कोरोनाची लागण होवून त्यांचे निधन झाले. पालिका सेवा बजावत असताना कामगारांचे निधन झाल्यामुळे महापालिका कामगारांमध्ये पुन्हा एकवार भीतीचे पसरले आहे. कोरोनाने मृत पावलेल्या कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या वाहन चालकाच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून कोरोना काळात आपण सेवा बजावतोय, आपल्यानंतरही पालिका आपल्या परिवाराची काळजी घेत आहे, हे चित्र यातून निर्माण होवून कामगारांनाही काम करताना निर्धास्तपणा येईल. कोरोना काळात काम करणाऱ्या कामगारांची मानसिकता जपण्यासाठी तसेच कोरोना काळातही सेवा बजावणाऱ्या कामगारांच्या कार्याचा कृतीतून गौरव करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून प्रशासनाने कोरोनाने मृत पावलेल्या वाहनचालक सुनील नामदेव वाघमारे यांच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.