इंटकच्या पाठपुराव्यामुळे महापालिका आयुक्तांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे धाव
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : वर्षानुवर्षे नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांना ‘समान काम-समान वेतन’ अथवा किमान वेतन द्यावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी पत्रव्यवहार करत मार्गदर्शनाची मागणी केली आहे. नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मागील काही महिन्यापासून ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना ‘समान काम समान वेतन’ धोरणानुसार वेतन देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याने महापालिका प्रशासनाला वेतनाबाबत राज्य सरकारच्या दरबारात चेंडू टोलवित त्यांच्याकडे मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे.
महापालिका प्रशासन दरबारी ४३ संवर्गात ५४३ कर्मचारी व अधिकारी ठोक मानधनावर काम करत आहेत. हे काम कामगार-अधिकारी वर्षानुवर्षे प्रशासन दरबारी काम करत असल्याने संबंधितांना कायम कामगार-अधिकाऱ्यांप्रमाणेच ‘समान काम-समान वेतन’ या धोरणानुसार वेतन देण्याची मागणी करत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सातत्याने कामगारांचे शिष्टमंडळ घेवून जात मागणीचा रेटा पुढे करत अन्य स्थानिक स्वराज्य संस्था समान कामाला समान वेतन देत असल्याचेही कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या शिष्टमंडळाच्या वाढत्या भेटीगाठी व लेखी पाठपुरावा यामुळे पालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे लेखी पत्रातून ठोक मानधनावरील कामगारांच्या वेतनाबाबत मार्गदर्शनाची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये आयुक्त अभिजित बांगर यांनी ठोक मानधनावरील कामगारांना कायम कामगारांप्रमणे वेतन-भत्ते दिल्यास पालिकेच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल याचाही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. कामगार नेते रवींद्र सावंत यांचा महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडे असलेल्या सततच्या भेटीगाठी व कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेले ‘वजन’ पाहता लवकरच आपल्याला ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा आशावाद ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून उघडपणे व्यक्त करण्यात येवू लागला आहे.