नामदेव भगत यांच्या पाठपुराव्याला पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोनाचा नवी मुंबई शहरात वाढत चाललेला विळखा पाहता नेरूळ गावातील नागरी आरोग्य केंद्रातही कोरोना लसीकरण (वॅक्सिन) देण्यात यावे यासाठी माजी सिडको संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांच्या पाठपुराव्याला अखेरीला यश आले असून महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून नेरूळ गावातील नागरी आरोग्य केंद्रातही गुरूवार, दि. ८ एप्रिलपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरूवात होणार आहे. नामदेव भगत यांनी याविषयी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
कोरोनाच्या आकडेवारीने नवी मुंबई शहरामध्ये उच्चांक गाठण्यास सुरूवात केली आहे. ठिकठिकाणच्या माता बाल रूग्णालयामध्ये व नागरी आरोग्य केंद्रामध्ये कोरोनावरील लसीकरण (वॅक्सिन) दिले जात असतानाही गर्दी वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नेरूळ गावातील नागरी आरोग्य केंद्रातही लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने कोरोना लसीकरण (वॅक्सिन) देण्यास सुरूवात करावी, यासाठी नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे गेल्या काही दिवसापासून पाठपुरावा सुरू केला होता. आरोग्य विभागातील संबंधितांच्या भेटीगाठीही घेत मागणीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनासही नामदेव भगत यांनी आणून दिले. या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने गुरूवार, दि. ८ एप्रिलपासून नेरूळ गावातील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नामदेव भगत यांनी पालिका प्रशासनाचे तर नेरूळवासियांनी नामदेव भगत यांचे आभार मानले आहेत.