सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ –Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ मधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमध्ये दररोज सॅनिटायझेशन करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ४ मध्ये महापालिकेची सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी आहे. सारसोळे गावचे ग्रामस्थ व्यापक विचारसरणीचे तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे असल्याने या स्मशानभूमीमध्ये सर्वांनाच अंत्यविधी करण्यास सहकार्य केले जाते. कोणालाही अडथळा केला जात नाही. नवी मुंबईतील स्मशानभूमीपैकी सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीतच कोरोना मृतदेहावर सर्वाधिक अंत्यसंस्कार झालेले आहेत. येथे अंत्यसंस्कार झाल्यावर महापालिका प्रशासनाकडून स्मशानभूमीत सॅनिटायझेशन होणे आवश्यक असते, दुर्देवाने या ठिकाणी कोरोना मृतदेहावर तसेच अन्य मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यावर सॅनिटायझेशन होत नाही. तसेच इतर मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना कोरोना आहे अथवा नाही याचीही काहीही माहिती नसते. त्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. कोरोना मृतदेहांवरही अंत्यसंस्कार होत असल्याने स्मशानभूमी कामगारांची व अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांचीही काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता सारसोळे स्मशानभूमीत दिवसातून एकवेळा सॅनिटायझेशन करण्याबाबत संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.