संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६/९८२००९६५७३ Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना काळात गेल्या सव्वा वर्षात नवी मुंबई शहरात नेरूळ सेक्टर ४ मध्ये असणारी महापालिकेची सारसोळे ग्रामस्थांकरीता असलेली सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी पुन्हा बाहेरील भागातील कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी येथे येवू लागल्याने पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे दिसू लागले आहे. कालच या स्मशानभूमीत पनवेल नोडमधील कळंबोलीतील कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीत आणला असता, सारसोळे गावचे युवा नेतृत्व मनोज मेहेर यांनी त्यास विरोध करत कोरोना मृतदेह पुन्हा पाठवून दिला. गेल्या आठवड्यात राजकीय घटकांच्या दबावामुळे आणि मनोज मेहेर एकवीरेला असल्याने दादर येथील कोरोना मृतदेहावर सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी एका कोपऱ्यात असल्याने व स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर राजकीय व प्रशासकीय दबाव आणून यापूर्वी मुंबई-ठाण्यातील, उरण-पनवेल भागातील कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. नवी मुंबईत इतर भागातही स्मशानभूमी असतानाही कोपरखैराणे, ऐरोली, वाशी, बेलापुर येथील कोरोना मृतदेहांवर सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. कोरोना मृतदेहांवर त्यांच्या स्थानिक निवासी परिसरातच अंत्यविधी करण्यात यावेत असे राज्य व केंद्र सरकारचे स्पष्टपणे निर्देश व मार्गदर्शक नियमावलीत उल्लेख असतानाही राजकीय नेत्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दबावामुळे या स्मशानभूमीत सुरूवातीला कोणत्याही भागातील कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी सर्रासपणे करण्यात येत होते. याविरोधात सारसोळे ग्रामस्थांनी आपला असंतोष व्यक्त करण्यास सुरूवात केली. बाहेरील भागातील कोरोना मृतदेहांवर सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका सारसोळेच्या ग्रामस्थांनी घेतली. याप्रकरणी सारसोळे गावचे युवा नेते मनोज यशवंत मेहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमालीची आक्रमक भूमिका घेतली. बाहेरील भागातील कोरोना मृतदेह आल्यावर त्यांना अंत्यविधीसाठी आल्यावर मनोज मेहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते मृतदेह परत पाठवून दिले.
नेरूळ व सभोवतालच्या परिसरातील रुग्णालयात कोरोनाने निधन झाल्यास तो मृतदेह सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणला जातो. अनेकदा हे मृतदेह उरण-पनवेल, ठाणे-मुंबई तसेच नवी मुंबईच्या अन्य भागातीलच असतात. रूग्णवाहिकेचे पैसे वाचविण्यासाठी मृताचे नातेवाईक सारसोळे शातीधाम स्मशानभूमीचा आधार घेतात. कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी राजकीय दबाव आणणारे राजकारणी या स्मशानभूमीत सुविधा पुरविण्यासाठी काहीही करत नसल्याचा संताप मनोज मेहेर यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. कोरोनाचे बाहेरील मृतदेह येत असल्याचे पाहून मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाला सांगून मागच्या कोरोना काळात स्मशानभूमीलाच टाळे ठोकले होते. या स्मशानभूमीत बाहेरील भागातील कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केले जाणार नसल्याचा फलकही मनोज मेहेर यांनी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर लावलेला आहे.
कोरोना मृतदेहावर अंत्यविधी झाल्यावर महापालिका प्रशासनाकडून स्मशानभूमीत वेळोवेळी सॅनिटायझेशन केले जात नाही. स्मशानभूमीतील कामगारांना सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाही. मनोज मेहेर यांच्या पाठपुराव्यामुळेच पालिका प्रशासनाकडून राखाडी धुण्यासाठी अंत्यविधीच्या ठिकाणीच पाणी महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले आहे. भाऊबीजेच्या दिवस असतानाही मनोज मेहेर यांनी दिवसभर उभे राहून राखाडीसाठी पाण्याचे काम करवून घेतले होते. कोरोना मृतदेहांवर अंत्यविधीसाठी होत असलेल्या वादाच्या घटना पाहून नवी मुंबईत कोरोना मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी मनोज मेहेर एक वर्ष महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत आहेत.
कोरोनाचा विळखा पुन्हा नवी मुंबई शहरामध्ये आक्रमक झाला आहे. कोरोना रूग्णांची शहरातील आकडेवारी दररोजची वाढू लागली आहे. मृतांचाही आकडा वाढू लागला आहे. दादर व कळंबोली येथे राहणाऱ्यांचे कोरोना मृतदेह येथे आल्याने पुन्हा वादाच्या घटना घडल्या आहेत. बाहेरील कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून देण्यास सारसोळे ग्रामस्थांचा आजही विरोध कायम आहे. मनोज मेहेर व त्यांचे सहकारी पुन्हा आक्रमक होत स्मशानभूमीकडे हेलपाटे मारू लागले आहेत. प्रसिध्दीमाध्यमेही मनोज मेहेरला साथ देत आहे. त्यामुळे कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीवरून नवी मुंबईत सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी पुन्हा एकवार वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.