राज्यात २०१४ ला भाजप-शिवसेना स्वतंत्र लढूनही निकाल लागले तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष होवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा दोन्ही काँग्रेसच्या गोटात स्मशान शांतता पसरली होती. मात्र मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नव्हते कारण धर्माधिष्टीत विचारांची पेरणी आणि नियोजनपूर्वक पोषण भाजप किती व्यापक प्रमाणावर करीत होता याची माहिती होती.
एखाद्या राज्यात सत्ता आणण्याचे काम कोणती प्रसार माध्यमे करु शकत नाहीत मात्र त्या दिशेने जाणारे मार्ग अधिक सोपे आणि व्यापक करु शकतात. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध वातावरण तयार करण्यात जशी लहान-मोठ्या वृत्तपत्रांनी भूमिका बजावली तेच काम २०१४ च्या पूर्व आलेल्या दोन्ही काँग्रेसच्या तीन टर्मच्या काळात वृत्तपत्रांनी केले होते. दोन्ही काँग्रेसचे वैचारीक मुखंड चिंतेत पडले होते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भाजपसारखा धर्मवादी पक्ष फोफावलाच कसा? दोन्ही काँग्रेसच्या सेक्युलर विचारधारेचा पराभव कसा झाला? धर्म निरपेक्ष विचारांचा प्रसार करण्यात आपण कुठे कमी पडलो यावर मात्र कुणाला चिंतन करावे असे वाटले नाही.
तसे बघितले तर भाजप आणि संघाच्या विचारांची तरुण भारत वगळता अन्य कोणतीच प्रसार माध्यमे या राज्यात कधीच नव्हती. मात्र त्यासाठी भाजपने नियोजन करुन माध्यमांना जवळ करणे सुरु केले. भाजपच्या प्रवक्त्यांनी म्हाळगी प्रबोधनीत खास कार्यशाळा घेऊन त्यावर चिंतन केल्यावर आपल्या विचारांच्या नव्हे तर काँग्रेस विरोधी पत्रकार, मालक, विविध चॅनल्स आणि विचारवंताना गोळा करायला सुरुवात केली.
तोवर दोन्ही काँग्रेसमधील पुढारी एवढे उन्मत्त आणि मस्तवाल बनले होते की, आता आपल्याला कोणत्याच वृत्तपत्र, पत्रकारांची गरज नाही असे त्यांना वाटत होते. पुरोगामी चळवळी, लेखक, कलावंत, व्याख्याते, पत्रकार, परिवर्तनवादी संघटना ह्या जणू आपल्या खुट्याला बांधलेल्या आहेत असे हे लोक वागायला लागले होते. हाच बुद्धीवादी असंतोष भाजपला फायद्याचा ठरला. त्यांनी पक्षातल्या विविध जाती, धर्माच्या नेत्यांच्या माध्यमातून नाराज माध्यमांशी मैत्रीचे नवे पर्व जोडायला सुरुवात केली. जिल्हास्तरीय छोट्या वृत्तपत्रांना आवश्यक ती रसद पोहोचवली त्यापोटी अट एकच होती. भाजप कसा चांगला आहे हे न सांगता दोन्ही काँग्रेस कशी लुटारु आहे यावर रकाने खर्च करा. मग काय भिडली मिळून सगळी छोटी वृत्तपत्रे त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांनी बघितले आहेच.
राजकीय पक्षांना आपले विचार आणि धोरणांच्या प्रचारासाठी माध्यमांची गरज असते. त्यासाठी सगळे पक्ष आपले छोटेसे मुखपत्र नावाला सुरु करतात मात्र त्यांचे खरे प्रचारक मोठमोठी दैनिके, वाहिन्याच असतात हे आता लपून राहिले नाही.
लोकमत वरकरणी काँग्रेसचे दैनिक वाटते पण तसे नाही. ‘जिधर पैसा बम, उधर हम’ असे व्यावसायिक धोरण त्यांचे आहे. सकाळ पवारांचे दैनिक असूनही नसल्यासारखे आहे. सामान्य कार्यकर्त्यांना सकाळ शरद पवारांचा वाटतो परंतु प्रतापराव पवारांना तसे वाटत नसते. तरुण भारत, सामना ही दैनिकं स्पष्टपणे भाजप आणि सेनेची मुखपत्रे म्हणता येतात. या दोन्ही मुखपत्रातून संपादकीय पानासह इतर पानातून पक्षाचा विचार, धोरणे प्रसारीत केली जात असली तरी हा विचार ज्यांच्यासाठी पेरला जातो त्या कार्यकर्त्यांच्या घरी ही दैनिके नसतात. त्या सर्वांना पहाटे लोकमत वाचण्याची हुक्की येत असते.
राज्यात भाजपचे पाच वर्ष सरकार होते. नागपुरातल्या सगळ्या संस्थांवर पक्षाचा ताबा होता मात्र तरुण भारत आणि प्रगतीची कधी गाठच पडली नाही, कारण विचारांची मुखपत्रे नेते आणि कार्यकर्ते गृहित धरीत असतात. तो विकत घेतला काय, जाहिरात दिली-नाही दिली तरी काही फरक पडणार नाही, असा त्यांचा पक्का समज झालेला असतो.
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनीही कधी आपल्या मेळाव्यात अर्धातास मुखपत्रासाठी आजवर दिला नाही, त्यामुळे मुखपत्रे वाढावी असे कुणाला वाटत नाही. दुसरीकडे धर्मनिरपेक्ष विचारांच्या वृत्तपत्रांबाबत दोन्ही काँग्रेसनेही तेच केले. राज्यात किती धर्मनिरपेक्ष वृत्तपत्रे आहेत? किती पुरोगामी संघटना, पत्रकार, विवेकी लेखक, कलावंत आहेत याची यादी करण्याची गरजही काँग्रेस विचारांना वाटली नाही. आता कोणत्याही मार्गाने का होईना, सत्तेवर आलेल्या आघाडीला सुद्धा त्याची गरज वाटत नसेल तर लक्षात घ्या, भाजपचा सराव अजून थांबलेला नाही. मग बसा बोंबलत असे झालेच कसे म्हणून?
- पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक :- दै.अजिंक्य भारत,अकोला
संवाद – ९८९२१६२२४८