नवी मुंबई : दैनिक सामना वृत्तपत्राचे मुख्य वृत्त प्रतिनिधी बाळासाहेब दारकुंडे यांचे वडील अप्पासाहेब पांडुरंग दारकुंडे यांचे आज सकाळी नगर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा बाळासाहेब, मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आप्पासाहेब दारकुंडे अहमद नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील एक प्रसिद्ध बागायतदार होते. संपूर्ण अहमदनगर जिल्यात एक प्रयोगशील व प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विविध प्रकारच्या मिरचीच्या उत्पन्नात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी विकसित केलेले मिरचीचे वाण पाहण्यासाठी विविध ठिकाणच्या कृषी विद्यालयाचे विद्यार्थी त्याच्या शेतात गर्दी करीत असत. सामाजिक कार्याची आवड असलेले अप्पासाहेब हे विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन करीत असत. अप्पासाहेब यांचा अध्यात्माचाही गाढा व्यासंग होता. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त असल्याने ते गेली अनेक वर्षे आळंदी पंढरीची नेमाने वारी करीत असत.
काल अस्वस्थ वाटू लागल्याने नगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. दुपारी सुरेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.