मुंबई : कोरोनाने थैमान घातले असून राज्यातील सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकार त्यांच्या पातळीवर काम करत आहे परंतु पक्ष म्हणून काँग्रेसने या कठीण काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘राज्य कोविड मदत व सहाय्य केंद्राचे’ व्हर्च्युअल उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष माणिकराव जगताप, आ. धीरज देशमुख आदींनी व्हीसीद्वारे भाग घेऊन आपली मतं मांडली व सुचनाही केल्या.
नाना पटोले म्हणाले की, कोरोना महामारीने मोठे संकट उभे ठाकले आहे. लोकांना वैद्यकीय मदतीची नितांत गरज आहे, अशा कठीण प्रसंगी काँग्रेस नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जात असते. देशासाठी काम करण्यात काँग्रेस नेहमीच अग्रभागी राहिला आहे. आजच्या कोविड संकटातही लोकांना मदत करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता तालुका, जिल्हा, वार्डा-वार्डातून दुःखीकष्टी जनतेच्या मदतीला धावून जाईल. जिल्हा काँग्रेसची सर्व कार्यालये २४ तास या मदत कार्यात उघडी राहतील. मुंबईतील टिळक भवन या पक्ष कार्यालयात मुख्य मदत केंद्र आहे. या मदत केंद्रावर येणाऱ्या फोनची नोंद घेऊन स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
राज्यात सध्या रक्तचा भयंकर तुटवडा आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ‘रक्तदान सप्ताह’ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. राज्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेतली जातील. याकामात युवक काँग्रेस, एनएसयुआय, सर्व सेल व फ्रटंलचे सदस्य सहभाग घेतील. या माध्यमातून जमा करण्यात आलेले रक्त हे शासकीय रक्तपेढ्यांना दिले जाईल. मुंबईतून १० हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प मुंबई काँग्रेसने केल्याचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.