नवी मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी गुरूवारी शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्याकडे सुपुर्द केला.
जवळपास साडे तीन दशकाहून अधिक कालावधीत सामाजिक, शैक्षणिक, सहकार व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नामदेव भगत यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. जवळपास तीन दशके काँग्रेस पक्षात कार्यरत राहून युवक काँग्रेसपासून प्रदेश काँग्रेसपर्यत मजल मारली होती. सिडको संचालकपदाचाही त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळताना स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या समस्या सोडविल्या. नेरूळमध्ये आगरी-कोळी भवनाची सिडकोच्या माध्यमातून निर्मिती करताना स्थानिकांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक अनेक वर्षे आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करत नवी मुंबईतील कॉलनीवासियांना येथील आगरी-कोळी समाजबांधवांच्या जुन्या चालीरिती, सामाजिक वाटचाल, प्रथा, परंपरा याची माहिती देण्याचा प्रयत्न नामदेव भगत यांनी प्रामाणिकपणे केला आहे. गत पालिका निवडणूकीत नामदेव भगत यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. प्रभाग 93 मधून ते शिवसेनेच्या तिकिटवर विजयी होवून पालिका सभागृहात गेले. महापालिकेच्या दुसऱ्या सभागृहापासून नामदेव भगत हे नगरसेवक म्हणून कार्यरत असून अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे.
व्यक्तिगत कारणास्तव आपण राजीनामा दिलेला असून शिवसेना पक्षात कार्यरत असताना शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, खा. राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, महिला जिल्हा संघठक सौ. रंजना शिंत्रे यांच्यापासून सहकार्य करणाऱ्या सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे व शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. नामदेव भगत यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या आगामी वाटचालीबाबत चर्चेचा सूर जोरदारपणे आळविला जावू लागला आहे.