नवी मुंबई : वय वर्षे १८ वर देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महापालिका शाळा, खासगी शाळा, समाजमंदिर ताब्यात घेवून कोरोना महामारीचा उद्रेक नियत्रंणात आणण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक व नेरूळचे विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारी नियत्रंणात आणण्यासाठी १ मे २०२१ पासून वय वर्षे १८ वरील सर्वानाच सरसकटपणे लस देण्यात येणार आहे. आता सध्या ४५ वर्षे वयाच्या वरील सर्वानाच लस देण्यात येत आहे. लस देण्याच्या ठिकाणी सध्या नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालय तसेच खासगी ठिकाणी लस दिल्या जाणाऱ्या रूग्णालयातही गर्दी असते. वय वर्षे १८ वरील सर्वाना लस देण्यास सुरूवात झाल्यावर त्या ठिकाणी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. कोरोना नियत्रंणासाठी देण्यात येणारी लस घेण्यासाठी गर्दी जमल्यास कोरोना वाढीला खतपाणी मिळेल. १ मेपासून वय वर्षे १८ वरील सर्वानाच लस देण्यापूर्वी नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालये, निवडक खासगी रूग्णालये यांच्याजोडीला महापालिका शाळा, खासगी शाळा, समाजमंदिर ताब्यात घेवून त्या ठिकाणी लस देण्यात यावी. मात्र कोठे गर्दी होणार नाही, कोरोना महामारी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होईल, कोरोना वाढीला खतपाणी मिळणार नाही याकडेही पाहण्यात यावे. प्रभाग ८७ मधील एमजीएम शाळा प्रशासनाने ताब्यात घेवून त्याही ठिकाणी नेरूळ सेक्टर ८ व १० मधील रहीवाशांना प्रभागातच लसीकरण उपलब्ध होईल. त्यामुळे तातडीने खासगी शाळा, महापालिका शाळा व पालिकेच्या अन्य वास्तूंमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.