नवी मुंबई : आपण शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असला तरी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचे स्पष्टीकरण सिडकोचे माजी संचालक व नवी मुंबई महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
नामदेव भगत हे नवी मुंबईच्या राजकीय क्षेत्रातील मातब्बर नेतृत्व असल्याने शिवसेना सोडल्यावर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता लागली आहे. काही प्रसिध्दीमाध्यमांनी तर नामदेव भगत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचे सांगितल्याने उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
आपणाला राजकीय, सहकार, शैैक्षणिक, धार्मिक व अन्य विभागात गेली 33 वर्षाचा अनुभव असून काँग्रेस पक्षामध्ये अडीच दशकाहून अधिक काळ कार्यरत राहताना तळापासून प्रदेश पातळीपर्यत पदे आपण भूषविली आहेत व आपल्या कामातून त्या पदांना न्याय मिळवून दिला असल्याचे सांगत नामदेव भगत पुढे म्हणाले की, नवी मुंबई महापालिकेच्या दुसऱ्या सभागृहापासून सभागृहात आपण कार्यरत असून नवी मुंबईच्या अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे. अनेक विकासकामे करण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडले आहे. स्थायी समिती सदस्य, विषय समित्यांपासून विरोधी पक्षनेतेपदाचीही आपण जबाबदारी सांभाळलेली आहे. शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर आपल्या अनुभवाचा वापर पक्षसंघटना वाढीसाठी केला जाईल असे अपेतिि होते, परंतु शिवसेनेत सहा वर्षे शिवसैनिक म्हणून कार्य करताना संघटनेने आपणावर नवी मुंबईत विशेष जबाबदारी सोपविली नाही. जनसामान्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या माझ्यासारख्या तळमळीच्या, तळागाळातील कार्यकर्त्याला स्वस्थ बसणे कदापि शक्य नसल्याने आपण शिवसेना सोडली. तथापि आपण कोणावरही नाराज नाही, उलटपक्षी आपण शिवसेना सोडताना सर्वाचे आभारच मानले असल्याचे नामदेव भगत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
शिवसेना सोडल्यावर अनेक शिवसेना पदादिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी तसेच शिवसैनिकांनी आपली भेट घेतली व आपले मनही वळविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसमधील काही हितचिंतकांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी गळ घातली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांची भेटही घेतली त्यांनी स्वागत ही केले आपणास 1 मे 2021 रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे सुचविले. तथापि आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये यासाठी काही घटकांनी प्रवेशापूर्वीच अडथळे आणण्यासाठी सक्रिय योगदान देण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय नवी मुंबईतील तसेच मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या परिचितांनी, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी जोरदार आग्रह धरला आहे. शिवसेनेकडून पुन्हा येण्यासाठी संपर्क सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण सर्वाशी चर्चा करून, कार्यकर्ते, हितचिंतक यांची भूमिका जाणून घेवून आपण लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नामदेव भगत यांनी यावेळी स्पष्ट केले.