मुंबई : गेली साडे तीन दशके सहकार, शैक्षणिक,धार्मिक, राजकीय चळवळीत सक्रिय कार्यरत असणारे नवी मुंबईतील मातब्बर राजकारणी नामदेव भगत यांनी शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय क्षेत्रातील अनुभव पाहता नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्र्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
नामदेव भगत हे नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे कार्यरत असून गेली तीस वर्षे ते काँग्र्रेस पक्षात कार्यरत होते. स्थानिक पातळीवरील पदापासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिसपदापर्यत त्यांनी आपल्या कार्यप्रणालीच्या बळावर मजल मारली होती. दुसऱ्या सभागृहापासून ते नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. सिडकोचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे.
गत महापालिका निवडणूकीत नवी मुंबईतील काँग्रेसमधील अंर्तगत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करत शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग 93 मधून ते नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तथापि शिवसेना पक्षात गेली 6 वर्षे शिवसैनिक म्हणून पक्षसंघटनेचे कार्य करताना नामदेव भगत यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी सोपविली नाही. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा कोणत्याही प्रकारचा वापर करून घेतला नाही, त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नाही. साडेतीन दशके सक्रिय असणाऱ्या नामदेव भगत यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाची शिवसेनेत घुसमट होत होती. अखेरिला त्यांनी विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करत शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. कोणावरही टीकाटिपणी न करता सर्वाचे आभार मानत काही दिवसापूर्वीच नामदेव भगत यांनी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्याकडे आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
काँग्रेसमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव नामदेव भगत यांनी शिवसेना सोडल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी सदिच्छा भेट घेतली. नाना पटोळे यांनी त्यांना 1 मे रोजी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश घेण्याचेही सुचविले. तथापि नवी मुंबई काँग्रेसमधील काही मातब्बरांनी नामदेव भगत यांच्या प्रवेशाला विरोध दाखवित हालचाली सुरू केल्या. पुन्हा काँग्र्रेसमध्ये जावून स्थानिकांच्या गटबाजीमुळे आपल्या कामावर व नेतृत्वावर मर्यादा पडणार असल्याचे पाहून नामदेव भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नामदेव भगत यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांनी दिली.
आज सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्र्रेसमध्ये प्रवेश केला. नामदेव भगत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रबळ ग्रामस्थ चेहऱ्याचे नेतृत्व लाभणार असून राष्ट्रवादीची ताकदही वाढणार असल्याचे मानले जात आहे.